माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा हल्लाबोल
वैभववाडी (प्रतिनिधी) : कार्यकर्ते फोडण्याची वेळ आमदार नितेश राणे यांच्यावर आली नसती. तुमच्या धमकीला आमचे कार्यकर्ते भीक घालणार नाहीत.तुम्ही किती घरे उद्ध्वस्त करणार ते सांगा त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. असे आव्हान उबाठा शिवसेन पक्षाचे नेते सतीश सावंत यांनी दिले आहे.
वैभववाडी शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके, युवसेना जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, संदीप सरवणकर,रजत रमदुल, पंढरीनाथ तावडे, सुरेश पांचाळ यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सावंत पुढे म्हणाले, वैभववाडी तालुक्यात शिवसेनेचे अस्तित्व नाही म्हणत होते. त्यांना शिवसेनेची आता ताकत कळली आहे. त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आमदार वैभववाडीत ठाण मांडून बसले आहेत.यावरून शिवसेनचे अस्तित्व सिद्ध झाले आहे. असे सावंत म्हणले.
तुम्ही पैसे देऊन कार्यकर्ते फोडलात तरी कट्टर शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. त्यामुळे त्या बूथवरही आम्हाला चांगले मतदान मिळेल. आमदार राणे यांनी दहा वर्षात कणकवली, वैभववाडी तालुक्यात कमिशन गोळा करण्यापलीकडे कोणतेही काम केले नाही. मतदार संघातील वन संज्ञा, काजुचा प्रश्न, उसाचा प्रश्न असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. तर धरण प्रकल्पातून कमिशन घेतली मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. हे प्रश्न सोडवले असते तर ही वेळ आली नसती.साधा वैभववाडीचा पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हा टँकर मुक्त जिल्हा मग टँकरची गरज का भासते. असा सवाल सावंत यांनी केला.
आमदार नितेश राणे पक्ष बदलतात तसे त्यांचे विचार बदलतात,काँग्रेसमध्ये असताना ते आरएसएस व भाजपवर जोरदार टीका करायचे.आरएसएसला हाफ चड्डीवाले म्हणून हिनवत होते आता ते स्वतः भाजपमध्ये गेल्यानंतर कट्टर हिंदुत्ववादी असल्याचे दाखवत आहेत. जर तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी असाल तर तुम्हांला मुस्लिम समाजाच्या मतांची गरज का पडते असा प्रश्न सावंत यांनी केला आहे.राणेचे हिंदुत्व हे स्वार्थी असल्याचा आरोप त्यांनी केला.
देवगड तालुक्यात जावेद शेख नावाचा नितेश राणे यांचा कार्यकर्ता इनोव्हा गाडीवर भारत सरकार असे लिहून तालुक्यातील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील लोकांकडे जात आहे. मुस्लिम कार्यकर्त्यांना आमदार नितेश राणे यांना फोन लावून देत आहे. या फोनवर माझ्या बापाचा पराभव झाला तर मी तुम्हाला सोडणार नाही, 2009 मधील वळंजू व सुदिन बांदिवडेरांचे काय झाले माहित आहे का? अशी धमकी आमदार राणे अल्पसंख्यांक बांधवांना देत आहेत.असा आरोप करीत
याची निवडणूक आयोगाने योग्य ती दखल घ्यावी.अशी मागणी सावंत यांनी केली आहे.मात्र निवडणूक आयोग हा भाजपाचा घरगडी असल्यासारखा वागत असून आमच्याशी दुजाभाव करीत आहे. माद्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्याच्या आधारे कारवाई करावी.आमदार नितेश राणे यांचे वडील पराभवाची हॅट्रिक होणार आहे. हा पराभव पचवण्याची ताकद तुम्हाला मिळो असा खोचक टोला ही सावंत यांनी लावला आहे.
आमदार नितेश राणे यांच्या धमक्याना शिवसैनिकांनी घाबरून जाऊ नये. शिवसैनिकांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असून आमचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांना तालुक्यातून चांगले मताधिक्य मिळवून देऊ असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे.












