सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या.सिंधुदुर्गनगरी या संस्थेला सन २०२३ ते २०२४ या आर्थिक वर्षात विक्रमी असा ७ कोटी 4 लाख रुपये एवढा नफा झाला आहे. या वर्षात सभासद संख्या कमी होऊनही अभ्यासू संचालक मंडळ, कार्यतत्पर कर्मचारी वर्ग व सहकार्य देणारे मालक सभासद या सर्वांच्या साथीने पतपेढीने ही उत्तुंग कामगिरी केली असल्याचे विद्यमान अध्यक्ष नारायण नाईक यांनी म्हटले आहे.
मागील वर्षी मे महिन्यात निवडणूक होऊन नवीन संचालक मंडळ पतपेढीवर विराजमान झाले होते.आंतरजिल्हा बदली,सेवानिवृत्ती या कारणाने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात शिक्षक संख्या कमी झाल्याने पतपेढी सभासद संख्या लक्षणीय अशी घटली होती. यामुळे कर्ज वितरण कमी प्रमाणात होत होते. परंतु नूतन संचालक मंडळाने कुशल व्यवहार करत, पतपेढीतील अधिकारी व कर्मचारी वर्गाची योग्य साथ घेऊन, सभासदांचे सहकार्य मिळवत प्रतिकूल परिस्थितीतही विक्रमी नफा मिळविण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. कर्जावरील व्याज दर कमी करून अधिकाधिक कर्ज वितरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला असे अध्यक्ष नारायण नाईक व उपाध्यक्ष संतोष राणे यांनी सांगितले. यापुढेही सभासदांना लाभदायी ठरतील असे निर्णय भविष्यात संचालक मंडळ घेईल असे प्रतिपादन नाईक व राणे यांनी केले. संस्थेच्या या चढत्या आलेखीय कामगिरी बद्दल समस्त शिक्षक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.












