क्रेडाई महाराष्ट्रच्या कार्यकारिणीवर अभिजित जैतापकर यांची निवड

सिंधुदुर्गच्या बांधकाम व्यवसायाला राज्यपातळीवर प्रतिनिधित्व; महारेरा समितीवरही नियुक्ती

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बांधकाम व्यावसायिकांची देशपातळीवरील सर्वात मोठी आणि प्रभावी संघटना असलेल्या ‘क्रेडाई’च्या (CREDAI – Confederation of Real Estate Developers’ Associations of India) महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवर क्रेडाई सिंधुदुर्गचे सचिव अभिजित जैतापकर यांची २०२५–२७ कार्यकालासाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अ‍ॅथॉरिटी (MahaRERA) समितीवरही त्यांची नियुक्ती झाल्याने सिंधुदुर्गसारख्या ग्रामीण भागातील रिअल इस्टेट व्यवसायाला राज्यस्तरीय मंचावर प्रतिनिधित्व मिळाले आहे.

क्रेडाई ही रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्रित करून त्यांच्या समस्या,गरजा आणि विकासासाठी काम करणारी संघटना आहे. भारतात २१ राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी अलीकडेच जाहीर झाली. या कार्यकारिणीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व म्हणून अभिजित जैतापकर यांचा समावेश करण्यात आला आहे.

याआधीही राज्यस्तरीय समित्यांमध्ये सहभाग

अभिजित जैतापकर हे यापूर्वी देखील ‘सिटी ब्रँडिंग आणि टुरिझम’ समितीवर कार्यरत होते.या भूमिकेत त्यांनी जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवले होते. त्यांचा अनुभव, संघटन कौशल्य, आणि क्रियाशील नेतृत्व लक्षात घेता त्यांची आता राज्य कार्यकारिणी व महारेरा समितीवर निवड झाली आहे.

पदग्रहण समारंभ पुण्यात

या नव्याने नियुक्त झालेल्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा २१ एप्रिल रोजी पुणे येथील J W Marriott हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्व क्रेडाई सदस्य, बांधकाम व्यावसायिक आणि उद्योगपती उपस्थित राहतील.

सिंधुदुर्गच्या बांधकाम क्षेत्रासाठी मोठा टप्पा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय सध्या झपाट्याने विकसित होत असून महारेरा, शासकीय परवानग्या,पर्यावरणविषयक मंजुरी,ग्राहकांशी व्यवहार यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये अडचणी येत असतात. क्रेडाईच्या राज्य कार्यकारिणीमध्ये प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे या सर्व मुद्द्यांवर आता जिल्ह्याचे मत अधिक प्रभावीपणे मांडता येणार आहे.

भविष्यासाठी नव्या संधी

या निवडीबद्दल क्रेडाई सिंधुदुर्गच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी अभिजित जैतापकर यांचे अभिनंदन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जैतापकर म्हणाले, “सिंधुदुर्गातील बांधकाम व्यावसायिकांची ज्या विविध अडचणी आहेत मग त्या महारेराशी संबंधित असोत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांशी त्या सोडविण्यासाठी मी कायम उपलब्ध राहीन. तसेच जिल्ह्यातून क्रेडाई अंतर्गत नवीन प्रशिक्षण, सेमिनार्स आणि बांधकाम क्षेत्राशी संबंधित उपक्रम सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.ही निवड माझ्यासाठी सन्मानासोबतच एक मोठी जबाबदारी आहे.”

error: Content is protected !!