देवगड (प्रतिनिधी) : देवगड बंदरातील ‘मुक्ताई’ या मासेमारी बोटीवर दि. ११/१२/२०२३ रोजी पहाटे ४.०० चे सुमारास लोखंडी भाल्याने हल्ला चढवून तांडेल रणजीत डोर्लेकर याचा खून केल्याप्रकरणी आणि सह खलाशांवर प्राणघातक हल्ला करुन त्यांना जखमी केल्याप्रकरणी तसेच मासेमारी बोट जाळून टाकल्याप्रकरणी अटकेतील संशयित आरोपी अनंत रामचंद्र तांबे याची मे. सत्र न्यायालयाने जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. याकामी आरोपीच्या वतीने अॅड कौस्तुभ मराठे यांनी युक्तीवाद केला.
देवगड बंदरात मारेमारी करुन आलेल्या ‘मुक्ताई’ या मासेमारी बोटीवर कामाला असलेल्या तांडेल व इतर ३ खलाशांवर संशयित आरोपीने प्राणघातक हल्ला चढवला होता. या हल्ल्यात तांडेल मरण पावला होता. तर इतर ३ खलाशी गंभीर जखमी झाले होते. या खूनी हल्ल्यानंतर संशयित आरोपीने ‘मुक्ताई’ या बोटीला आग लावून संपूर्ण बोट व त्यावरील मासेमारीची मौल्यवान जाळी पेटवून दिली होती. सदर हल्ल्यामध्ये सापडलेल्या जखमींनी समुद्रात उडी मारुन स्वतःचा जीव वाचवला होता. याकामी देवगड पोलीसांनी संशयिताविरुध्द भा.दं. वि. कलम ३०२, ३०७, ४३६, ३२६, ३२४, ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला देवगड किनाऱ्यावरुन ताब्यात घेतले होते. प्रस्तूत कामी मे. सत्र न्यायालयाने आरोपी रक्कम रु. ५०,०००/- च्या सशर्त जामीनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.










