कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील कलांकुरांना पालवी फुटावी या उद्देशाने नवोदितांची पाणपोई म्हणून १९९१ साली अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर स्थापन झालेल्या अक्षरसिंधु साहित्य कलामंच सिंधुदुर्ग, कणकवली या सांस्कृतिक साहित्यिक संस्थेला येत्या १० मे रोजी ३३ वर्षे पूर्ण होऊन संस्था ३४ व्या वर्षांमध्ये पदार्पण करत आहे. आपल्या सारख्यांच्या सहकार्यामुळे अल्पावधीतच संस्थेने उत्तुंग शिखर गाठलेले आहे. आणि याच गोष्टीचे औचित्य साधून येत्या रविवार दिनांक ०५ मे २०२४ रोजी स्नेहमेळाव्याचे आयोजन केलेले आहे. गेल्या या ३३ वर्षाच्या प्रवासात संस्थेने विविध सांस्कृतिक, साहित्य, नाट्य, संगीत व लोककला अश्या विविध क्षेत्रांमधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आणि सिंधुदुर्गातील नवोदित कलाकार यांना व्यासपीठ मिळवून दिलेले आहे. संस्थेने सिंधुदुर्गासह देशातील सहा राज्यांमध्ये आपली अल्पावधीत ओळख निर्माण केलेली आहे. संस्थेने राबवलेल्या साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील उपक्रमांचा विविध मान्यवरांनी गौरव केलेला आहे. आणि गेली ३३ वर्षाचा हा वटवृक्ष होण्यामध्ये अनेक साहित्य ,सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांचे फार मोठे योगदान आहे. केवळ कलाकार आणि साहित्यिकांपुरती संस्था मर्यादित न राहता त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब ही या अक्षरसिंधु परिवारामध्ये सहभागी झाले आणि परिवार वाढत गेला. अशा या परिवाराच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आणि परस्पर स्नेहभाव वृद्धिंगत करणे या उद्देशाने रविवारी सर्व संस्थापक सदस्य सन्मा. महेश काणेकर, कै.उत्तम पवार, कै.अविनाश सरवणकर, विजय चव्हाण, अजय कांडर, सुरेश कुराडे, संजय राणे, हरिभाऊ भिसे, किशोर कदम, मयुर चव्हाण, ऋषिकेश कोरडे यांच्या उपस्थितीत स्नेह मेळाव्याचे आयोजन केलेले आहे .
भविष्यात अक्षरसिंधु नाट्य आणि साहित्य क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम घेऊन येत आहे या उपक्रमांवर चर्चा करून त्याला मूर्त रूप देणे तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळ अधिक वृद्धिंगत कशी होईल यासाठी अक्षरसिंधु परिवाराकडून योगदान कसे देता येईल याबाबत या ठिकाणी विचार विनिमय करण्यात येणार आहे. तसेच अक्षरसिंधुच्या या ३३ वर्षाच्या प्रवासात ज्या कुटुंबाने भरीव योगदान दिलेले आहे अशा परिवारांचा अक्षरसिंधु परिवाराकडून सन्मानही करण्यात येईल.
तरी जास्तीत जास्त आजी-माजी सर्व कलाकार, संस्था सदस्य, सभासद यांनी आपले उपस्थिती दाखवावी असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय चव्हाण यांनी केलेले आहे.
कार्यक्रमाचे नियोजन आणि रूपरेषा खालीलप्रमाणे :-
सत्र -०१
सका.९.०० ते दुपा. २.०० – वनभोजन (ब्राह्मण भोजन).
ठिकाण :- महापुरुष मंदिर रेल्वे स्टेशन नजीक, कणकवली.
सत्र-०२
सायं. ४.३० ते सायं.६.३० – सन्मा.संस्थापक आणि संस्था सदस्य यांची सहविचार सभा.
सायं.६.३० ते रात्रौ.१० – सहभोजन.
( शाकाहारी/ मांसाहारी)
ठिकाण :- गोपुरी आश्रम हॉल, नाईक पेट्रोल पंपाच्या मागे ,वागदे.