खूनाच्या अतिगंभीर गुन्ह्याचा अवघ्या 2 तासांत उलगडा ; मारेकरी गजाआड

दोडामार्ग पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

दोडामार्ग (प्रतिनिधी) : खूनासारख्या अतिगंभीर गुन्ह्याचा अत्यंत शिताफीने तपास करत दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला ताब्यात घेतले.  समीर ज्ञानेश्वर  पेडणेकर ( वय 36, रा. झरेबांबर, काजुळवाडी, ता दोडामार्ग ) असे आरोपीचे नाव आहे. साटेली भेडशी येथील वामन संकुल येथील इमारतीच्या मधल्या पॅसेजमध्ये अमर मनोहर देशमाने याचा मृतदेह 22 मे रोजी सकाळी 7 च्या सुमारास आढळला होता. मयत अमर च्या डोक्यावर लाकडी फळीने जोरदार प्रहार करण्यात आला होता.त्यातच अतिरक्तस्राव होऊन अमर चा मृत्यू झाला होता. ही घटना 21 मे रोजी रात्री साडे नऊ ते 22 मे रोजी सकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान घडली होती. याबाबत चा गुन्हा दोडामार्ग पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर तपासाची सूत्रे आपल्या हाती घेत पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी आपल्या सहकारी पोलीस उपनिरीक्षक भगत व अंमलदार माळगावकर, सुतार,विजय यांच्या सहकार्याने अतिवेगाने खूनाच्या घटनेचा तपास केला. गोपनीय माहिती मिळाल्यानुसार भेडशी परिसरात आरोपीचा शोध घेतला. संशयित आरोपी समीर पेडणेकर याला खालचा बाजार येथे पकडले. पेडणेकर च्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते.गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित असलेल्या समीर पेडणेकर याला अवघ्या दोन तासांत त्याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता मयत अमर याने आपणास आईवरून शिवीगाळ केली. त्या रागातून आपणच अमर देशमाने याचा खून केल्याची कबुली समीर पेडणेकर याने पोलीस तपासात दिली. कायदेशीर प्रक्रिया पार पाडत 22 मे रोजी सायंकाळी 7 वाजता आरोपी समीर पेडणेकर याला अटक करण्यात आली आहे. अवघ्या दोन तासांत खूनासारख्या गंभीर गुन्ह्याची उकल करण्यात यशस्वी ठरलेल्या दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी आणि त्यांच्या टीम चे दोडामार्ग तालुक्यात जनमाणसांत कौतुक होत आहे.

error: Content is protected !!