भारतीय डाक विभागाकडून सिंधुदुर्ग किल्ला विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

मालवण (प्रतिनिधी) : “सिंधुदुर्ग किल्ला” या विशेष टपाल पाकिटाचे अनावरण हा केवळ आपल्या उज्वल इतिहासाचा उत्सवच नाही तर आपला ऐतिहासिक वारसा पुढील पिढीला कळावा यासाठी टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे. हे एक स्मरणपत्र आहे की आपला भूतकाळ हा केवळ इतिहासापुरता मर्यादित असलेल्या घटनांची मालिका नसून एक जिवंत वारसा आहे. जो आपल्या वर्तमान आणि भविष्याला आकार देत असतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व आणि आपल्या उज्वल इतिहासाचा वारसा जपण्याचा हा पोस्ट खात्याचा एक प्रयत्न आहे. असे प्रतिपादनचीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल किशन कुमार शर्मा यांनी येथे केले.

दरवर्षी डाक विभागामार्फत देशातील विशेष महत्व असलेल्या ऐतिहासिक वास्तू, संस्था, निवडक उत्पादने, सांस्कृतिक वारसा यांचे विशेष टपाल पाकिटाच्या रूपाने प्रकाशित करून सन्मानित करण्यात येते. या अनुषंगाने सिंधुदुर्ग डाक विभागाने सिंधुदुर्ग किल्ल्त्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन त्याबाबत विशेष टपाल पाकिट प्रकाशित करण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरीसाठी घेण्यात आला होता. हा प्रस्ताव त्वरित मंजुर करण्यात आला. आज ९ जून रोजी येथील प्रधान डाक घर येथे चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल किशन कुमार शर्मा यांच्या हस्ते “सिंधुदुर्ग किल्ला” या विशेष टपाल पाकिटाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन आर. के. जायभाये, पोस्टमास्तर जनरल महाराष्ट्र सर्कल अमिताभ सिंग, डाक निदेशक (मुख्यालय), महाराष्ट्र सर्कल अभिजित बनसोडे, डाक निदेशक, गोवा रिजन रमेश पाटील यांसह बहुसंख्य टपाल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजानी ३५० वर्षापूर्वी उभारलेल्या भव्य सिंधुदुर्ग किल्ल्याचे विशेष टपाल पाकिट प्रकाशित करताना आनंद होत आहे. हा कार्यक्रम आपल्या ऐतिहासिक वारसा जपण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण क्षण आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेला सिंधुदुर्ग किल्ला अभूतपूर्व पराक्रमाच्या जाणिवेचा एक पथदीपक म्हणून उभा आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याची उत्तुंगता आणि भर समुद्रात उभा केलेला दुर्ग म्हणुन जटिल वास्तुकला ही आपल्या पूर्वजांच्या कारागिरी आणि स्थापत्यकलेचे जिवंत उदाहरण आहे. या किल्ल्याला स्वराज्याची नाभिक राजधानी म्हणुन ओळखले जाते व हा किल्ला मराठा शौर्य व दूरदृष्टीचे प्रतिक मानले जाते.

विशेष टपाल पाकीटाद्वारे या प्रतिष्ठित वास्तूचा इतिहास व महत्व जगासमोर आणण्याच्या प्रवासात पोष्ट खात्याचेही योगदान देण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग डाक विभागाने यासाठी घेतलेला पुढाकार आणि परिश्रम हे आम्हाला आज या महत्त्वपूर्ण प्रसंगी घेऊन आले आहेत, जिथे आपण एकत्रितपणे आपला ऐतिहासिक वारसा अभिमानाने आणि आनंदाने साजरा करू शकतो. अशा भावना या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

या कार्यक्रमाचे नियोजन सिंधुदुर्ग विभागामार्फत करण्यात आले होते. सूत्रसंचलन मुग्धा मुसळे यांनी केले. सिंधुदुर्ग डाक अधिक्षक मयुरेश कोले यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील प्रतिभासंपन्न युवा कलावंत पार्थ मेस्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज, किल्ले सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग डाक विभाग या आशयाची काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली.

error: Content is protected !!