निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करा ; चिंदर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गावकर यांची मागणी
ठेकेदारांची मुजोरी गिरी- ठेकेदारांवर वरदहस्त कुणाचा?
आचरा (विवेक परब) : गेले वर्षभर जिल्हासह चिंदर गावात अनेक ठिकाणी जल जीवन मिशनची कामे चालू आहेत. हरघर नळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. परंतु गेल्या वर्ष भर संबंधित काही ठेकेदारांनी काही कामात मुजोरी आणि मनमानी चालवली आहे. गटारात टाकलेले पाईप, निकृष्ट दर्जाच्या पाण्याच्या टाकीची कामे, बांधकाम झाल्यावर संबंधित बांधकामावर पाणी न मारणे, रस्त्याच्या मधोमध जेसिबीच्या सहाय्याने खोदा खोद अशी कामे चालली असून ठेकेदारांवर कारवाई संबंधित विभागाकडून केली जाईल का? हा प्रश्न जनसामान्यातून विचारला जात आहे.
चिंदर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गांवकर यांनी चिंदर ग्रामपंचायत येथे आज जल जीवन मिशन निकृष्ट दर्जाच्या कामान विषयी सरपंच यांना लेखी निवेदन देत चिंदर भटवाडी येथील गटारात घातलेला पाईप पहिल्या तूरळक पावसातच माती वाहून गेल्याने वरती आलेल्याचे छायाचित्र व चित्रीकरण सादर केले आहे. यावेळी बोलताना संतोष गांवकर म्हणाले संबंधित ठेकेदारांनवर अभियंता, वरिष्ठ अधिकारी यांचाही वरदहस्त असून जर संबंधित ठेकेदारांवर कारवाई झाली नाही तर जनतेच्या प्रश्नांनसाठी आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असून प्रसंगी उपोषणाचा मार्गही अवलंबणार आहे.











