कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील बांधकरवाडी येथील श्री देव दत्त मंदिरामधील पूजेच्या साहित्यासह घंटा, मुर्त्या आदी साहित्य मिळून सुमारे २० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला असल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. मंदिरातून चोरीस गेलेला मुद्देमाल व संशयित चोरट्याला बांधकरवाडी ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी मंदिराची पुजारी विजय करंबेळकर यांच्या फिर्यादीवरून संशयित चोरटा प्रमोद साहेबराव मिसाळ ( 32, रा. पुणे हडपसर, मूळ रा. उस्मानाबाद) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्त मंदिराचे पुजारी विजय कळंबेकर हे नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी मंदिरात पूजा करण्यासाठी गेले असता त्यांना मंदिराचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे त्यांनी आत जाऊन पाहिले असता मंदिरातील मुर्त्या, समई, घंटा व कपाटा मधील तामाने, तांब्या, पंचपात्री दिसून आला नाही. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती देवस्थान कमिटीच्या प्रमुखांना दिली.मात्र मंदिराचे पुजारी व देवस्थान कमिटीच्या प्रमुखांना मंदिरात चोरी करणारा संशयित हा स्थानिक असल्याचा संशय असल्याने ते शोध घेत होते. त्यादरम्यान त्यांना दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर येथे एक इसम संशयास्पद रित्या कीलतानाचे पोते घेऊन बसलेल्या स्थितीत आढळून आला. त्यावेळी त्याच्या जवळ असलेल्या कीलतानाच्या पोतात त्यांनी पाहणी केली असता त्यामध्ये घंटा व मंदिरातील इतर साहित्य मिळून आले. त्यामुळे देवस्थान कमिटीच्या प्रमुखांनी याबाबतची माहिती कणकवली पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार राजू जामसंडेकर यांना दिली. माहिती मिळताच कणकवली पोलीस नाईक श्री घाडीगावकर, महिला कॉन्स्टेबल प्रणाली जाधव व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक आर.बी. शेळके, राजू जामसंडेकर, गुरुनाथ कोयंडे आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित इसमाची चौकशी केली असता त्याने आपले नाव प्रमोद साहेबराव मिसाळ (रा. पुणे हडपसर ) असे सांगितले. तसेच संशयित प्रमोद मिसाळ यांने मंदिरातील चोरलेल्या साहित्यासह त्याला कणकवली पोलीस ठाण्यात हजर केले.












