चौके हायस्कूल येथे बहुविध कौशल्य अभ्यासक्रम वर्गाचे उदघाटन

रोटरी क्लब मुंबई माहीम यांचे विशेष आर्थिक साहाय्य

चौके (अमोल गोसावी ) : चौके येथील चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित भ. ता. चव्हाण, म. महाविद्यालय या प्रशालेला संस्थेच्या पुढाकाराने व रोटरी क्लब मुंबई माहीम यांच्याकडून विशेष आर्थिक सहाय्य प्राप्त झाल्याने या शाळेतील इयत्ता 8 वी व 9 वीतील विद्यार्थ्यांना बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचे दालन प्रशालेच्या नूतन ईमारतीच्या भव्य हॉलमध्ये खुले झाले आहे. या बहुविध कौशल्य अभ्यासक्रम दालनाचे बॅ. नाथ पै सेवांगण कट्टा चे कार्याध्यक्ष दिपक भोगटे यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. अनिरुद्ध बनसोड, संस्थापक व संचालक कॉज टू कनेक्ट फाउंडेशन , डॉ. प्रसाद देवधर, संस्थापक भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, चौके हायस्कूल संस्था अध्यक्ष जगदीश परब , संस्था सरचिटणीस संतोष धुरी , संस्था खजिनदार सुरेश चव्हाण , स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे, संस्था उपाध्यक्ष आर. जी. चौकेकर , मुख्याध्यापिका रसिका गोसावी, चौके उपसरपंच पी. के. चौकेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी या प्रशालेत शालेय पाठ्यक्रमाबरोबर शालेय मुलांना मोफत सुरू होणाऱ्या बहुविध कौशल्य अभ्यासक्रमात मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स म्हणून बागकाम व शेती तंत्रज्ञान यामध्ये कृषी तंत्र, रोपवाटिका, कलम प्रक्रिया, पशुसंवर्धन, बांधकाम व सुतार काम, फॅब्रिकेशन व वेल्डिंग, शोल्डरिंग, अन्न प्रशिक्षण तंत्रज्ञान यामध्ये पाककला, पॅकेजिंग, लेबलिंग आणि स्वच्छता याशिवाय ऊर्जा व पर्यावरण यामध्ये इलेक्ट्रिकल, सर्वेक्षण, ऊर्जा संबंधित मूलभूत माहिती असा या घटकांचा या कार्यशाळेत कुशल प्रशिक्षकांकडून थेअरी आणि प्रॅक्टिकल असा समावेश असणार आहे. यामुळे या प्रशालेतील विद्यार्थी शिक्षणाबरोबरच अंगी असलेल्या कौशल्याला प्राधान्य देतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी याचा नक्कीच फायदा होईल व भविष्यात चांगली नोकरी न मिळाल्यास आपल्या आवडत्या क्षेत्रात व्यवसाय म्हणून आपली प्रगती करतील असे कॉज टू कनेक्ट चे संस्थापक डॉ. अनिरुद्ध बनसोड यांनी सांगितले व विद्यार्थ्यांनी या उपलब्ध कौशल्य शिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी केले. यावेळी संस्थेने कॉज टू कनेक्ट चे संस्थापक डॉ. अनिरुद्ध बनसोड व रोटरी क्लब माहीमच्या रश्मी पाटील यांचे विशेष आभार मानले. प्रशालेत घेण्यात आलेल्या या नवीन उपक्रमाचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!