श्री केदारलिंगाचे दर्शन नियमित सुरु
कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : श्रावण षष्ठी यात्रेमुळे श्रीकेदारलिंगाच्या मूर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात आले असून भाविकांसाठी दर्शन नियमित सुरु राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव सुशांत बनसोडे यांनी दिली आहे.
श्री.केदारलिंग देवस्थान वाडी रत्नागिरी येथील श्री.केदारलिंग देवाच्या मूर्तीच्या संवर्धनाचे काम सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग पुणे यांच्यामार्फत दि.७ ते दि.११ जुलै २०२४ दरम्यान करण्यात येणार होते. परंतु आज दिनांक ६ जुलै रोजी वाडी रत्नागिरी येथील श्री.केदारलिंग देवाच्या सर्व पुजाऱ्यांनी बैठक घेऊन श्री.केदारलिंग देवाची श्रावण षष्ठी यात्रा दि.१० ऑगस्ट २०२४ रोजी होणार आहे. या यात्रेसाठी पुजारी वर्गाला, आधीपासून तयारी करावी लागते. याचा विचार करुन श्री.केदारलिंग देवाच्या मुर्तीच्या संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात यावे, अशी विनंती प्रशासक तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे निवेदन देवून केली आहे. या निवेदनाचा विचार करुन श्री.केदारलिंग देवाच्या मुर्ती संवर्धनाचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे श्री.केदारलिंग देवाचे दर्शन नियमित सुरु राहील, असे देवस्थान व्यवस्थापन समितीकडून कळवण्यात आले आहे.












