वैभववाडी बाजारपेठेत दुकानफोडी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बाजारपेठेतील दोन दुकाने फोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील सुट्टे पैसे लंपास केले आहेत. रविवारी पहाटे हा प्रकार घडला. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र दोन्ही दुकान चालकांनी या चोरीची तक्रार उशिरापर्यंत पोलीस ठाणेत दिली नाही.

शनिवारी रात्री सततधार पाऊस पडत होता. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी बाजारपेठेतील जुन्या बस स्थानकासमोर असलेले साहिल मेडिकल स्टोअर्सच्या समोरच्या शटर चे कुलूप तोडून स्टोअर्स मध्ये प्रवेश केला. तसेच या मेडिकल स्टोअर्स शेजारी असलेल्या रामेश्वर बेकरीचे गल्ली कडील बाजूच्या शटर चे कुलूप तोडून बेकरी मध्ये प्रवेश केला. 

दोन्ही दुकानातील इतर वस्तुंना चोरट्यानी हात न लावता दुकानातील केवळ सुट्टे पैसे व चिल्लर घेऊन पलायन केले. 

मेडिकल स्टोअर्सचे चालक समीर मुरकर हे रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे स्टोअर्स उघडण्यासाठी आले असता त्यांना मुख्य शटरची दोन्ही कुलपे तोडलेल्या स्थितीत दिसून आली. याची माहिती त्यांनी वैभववाडी पोलिसांना दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, पोलीस हवालदार  संदीप कांबळे, पोलीस नाईक धनाजी धडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर काही वेळातच रामेश्वर बेकरीचे कर्मचारी बेकरी उघडण्यासाठी आले असता बेकरीच्या गल्लीकडील बाजूचे शटरचे कुलूप तोडलेल्या स्थितीत मिळून आले. चोरट्याने हे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचे आतील सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले आहे. चोरट्याने आपला चेहरा पूर्णपणे झाकून घेतलेला दिसून येत आहे. तर त्याचा अन्य एक साथीदार तोडलेल्या शटर च्या बाहेरील बाजूस उभा असून त्याचे केवळ हात सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत. या चोरीचा सर्व प्रकार पहाटे चार वाजता घडल्याचे सीसीटीव्ही मधून स्पष्ट होत आहे. 

दरम्यान, या घटनेमुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेत चोरीस गेलेला माल किरकोळ असल्याने दोन्ही दुकान चालकांनी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत तक्रार दिलेली नाही.

error: Content is protected !!