जमीन मोजणी विभागाचा मनमानी कारभार

जिल्हाधिकाऱ्यांचा यंत्रणेवर अंकुश नाही ; पालकमंत्र्यांनी सुनावले खडेबाेल

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सर्वसामान्य नागरिकांच्या कामाबाबत महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांची दिरंगाई, जमीन मोजणी विभागाचा मनमानी कारभार यामुळे सामान्य माणूस दबला गेला आहे. मात्र मोठा धंनदांडगा ही सर्व यंत्रणा वापरत आहे. हे सासोली येथील प्रकरणावरून उघड झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा यंत्रणेवर अंकुश नाही. हे थांबले नाही तर त्या मोठ्या माणसाविरुद्ध मीच तक्रार करेन व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवतो म्हणून तडीपार करेन असा दम सुद्धा यावेळी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या उपस्थिती दिला.

सासोली येथील गरीब माणसं आपल्या न्यायासाठी उपोषण करतात. मात्र प्रशासन किंवा महसूल यंत्रणा, भूमी अभिलेख अभिलेख यंत्रणा कानाडोळा करत आहे. एखादा मोठा माणूस येतो व ही सर्व शासकीय यंत्रणा वापरतो. त्याचे मात्र झटपट काम होते. तहसीलदार सारखी व्यक्ती त्या मोठ्या व्यक्तीला एका दिवसात बिनशेती सनद देतात. ही अवस्था महसूल मधील अधिकारी कर्मचाऱ्यांचे आहे. तलाठी, मंडल अधिकारी, तहसीलदार सर्व एकाच माळेचे मणी आहेत. सर्वसामान्य नागरिकांची कामे करताना या यंत्रणेचे हात कापतात व कामात दिरंगाई होते. मात्र मी हे खपवून घेणार नाही, असा इशारा दिला.

error: Content is protected !!