कृषीदूतांतर्फे नांदगाव येथे कृषी मेळावा संपन्न !

कणकवली (प्रतिनिधी) : बुधवार दि. ३१ जुलै २०२४ रोजी नांदगाव ग्रामपंचायत सभागृह येथे कृषी मेळावा आयोजित केला गेला होता. हा मेळावा नांदगाव येथील कृषीदूतांतर्फे आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव या अंतर्गत हा कार्यक्रम राबवण्यात आला. आधुनिक शेती व तंत्रज्ञान हा या कार्यक्रमाचा मुख्य विषय होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव कृषी सहाय्यक अधिकारी सौ.उज्ज्वला तेली उपस्थित होत्या.तसेच सावडाव येथील प्रगतिशील शेतकरी उत्तम वारंग यांनी ही या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. मंचावर नांदगाव गावचे सरपंच रविराज मोरजकर व उपसरपंच इरफान अब्दुल गफूर साटविलकर कार्यक्रम समन्वयक एस.एस.मोटे, प्राध्यापक एल.एस.व्यवहारे व प्राध्यापिका कदम मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक माहिती मिळावी यासाठी या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल्स उदा. हायड्रोपोनिक्स , वर्मी कंपोस्ट तयार करून आणले होते.

तसेच आधुनिक शेतीसाठी लागणारी संसाधने, ग्रीन हाऊस मिनी मॉडेल्स व पिकांवर पडणारे रोग व‌ कीड यांचे फोटोग्राफ्स हे सुद्धा प्रदर्शनात मांडण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्या उज्ज्वला तेली यांनी शेतकर्यांना आधुनिक शेती व तंत्रज्ञान याचे फायदे सांगितले व त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रगतिशील शेतकरी उत्तम वारंग यांनी आंबा व‌ काजू यात राबवता येतील अशा विविध प्रक्रिया शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या. व यानंतर मराठे कृषी कॉलेजचे प्राध्यापक आणि कार्यक्रम समन्वयक एस.एस.मोटे व प्राध्यापिका कदम मॅडम यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शेतकऱ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले व त्यांना‌ मांडण्यात आलेले ‘कृषी‌ प्रदर्शन’ बघण्याची परवानगी देण्यात आली. यात कृषीदूत व महाविद्यालयातील शिक्षक या दोघांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. कृषी मेळाव्यास जि.प.पु. प्रा. विद्यालय नांदगाव चे विद्यार्थी , ग्रामस्थ व शेतकरी यांचा उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.

error: Content is protected !!