डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून

मागासवर्गीय नागरिकांना देण्यात आलेल्या बँचेस इतरत्र वळविल्या

जिल्ह्यातील अनु.जाती मागासवर्गीय जनता आंदोलनाच्या तयारीत

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागाच्या वतीने राज्यातील अनु जाती/जमाती मागासवर्गिय वड्या वस्त्यांवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास सन २०२३-२४ या योजने अंतर्गत ज्येष्ठ नागरिकाना वस्तीत बसण्यासाठी बेंच चे वाटप स्थानिक ग्रामपंचायती मार्फत करण्यात आले होते.मात्र सदर वाटपात मोठा घोळ घालण्यात आला असून जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायत मध्ये स्थानिक ग्रामसेवक,सरपंच यांनी संगनमतने मागासवर्गीय बांधवांना अंधारात ठेऊन सदर बँचेस मागासवर्गीय वस्तीत वितरीत न करता त्या अन्य वस्तीत वाटप केल्याच्या घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात उघड झाल्यामुळे मागासवर्गीय जनतेत मोठ्या प्रमाणत असंतोष पसरला असून याबाबत शासनाने तातडीने खुलासा न केल्यास मागासवर्गीय जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्ह्यातील बौध्द समाजाचे कार्यकर्ते तथा सामाजिक एकता मंच सिंधुदुर्ग चे कार्यवाह श्री संदीप कदम यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे शासनाला दिला आहे.

याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनु.जाती बांधवांची नुकतीच एक तातडीची बैठक संदीप कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली येथील म्हाळसाबाई भांडारकर ट्रस्ट इमारतीत संपन्न झाली. यावेळी रोहिदास समाजाचे राजाध्यक्ष संजय कदम,अँड सुदीप कांबळे, अनिल कदम,अतुल खरात, विठ्ठल चव्हाण, नीलेश जाधव,अनिल चव्हाण, महानंद चव्हाण, प्रकाश वाघेरकर, सागर चव्हाण, प्रभाकर चव्हाण,विद्याधर कदम,श्रगणेश चव्हाण, गंगाधर कदम,संदेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या बँचेस फक्त मागासवर्गीय वस्तीत द्यावयाच्या असताना त्या इतरत्र का वळविल्या ? ही फार गंभीर बाब असून सदर योजनेतून सुमारे अडीज कोटी एवढा निधी खर्च करण्यात आला असून यावरून सदर निधी मागासवर्गीय वस्त्यांवर खर्च झालेला दिसत नाही. हे यातून स्पष्ट होत आहे. याबाबत समाज कल्याण आयुक्त सिंधुदुर्ग यांची लवकरच भेट घेऊन त्यांना याबाबत अनु.जाती/जमाती समाजाच्या वतीने जाब विचारण्यात येणार असल्याचे देखील पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावातील मागासवर्गीय वस्ती मध्ये किमान ८ बँचेस नग देण्यात आले असून सदर बॅचेस मगासवर्गीय वस्तीत वितरित करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. सुमारे १ लाख रुपये प्रत्येक वस्तीवर खर्च करण्यात आले असून अनु.जाती वर्गाच्या नागरिकांना देण्यात आलेल्या या बँचेस याबाबत शासनाने व स्थानिक ग्रामपंचायतीने कुठलीच माहिती येथील मागासवर्गीय जनतेला न देता परस्पर बँचेस चे वाटप करून मागासवर्गीय जनतेच्या तोंडातील घास काढून घेऊन पळविण्याचे कटकारस्थान रचण्यात आल्याचा आरोप देखील मागासवर्गिय जनतेतून केला जात आहे.

खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने तर येथील मागासवर्गीय जनतेला आंधारात ठेऊन सदर बंचेस संपूर्ण गावाला शासनाच्या वतीने देण्यात आल्या असल्याचे सांगून स्थानिक आमदारांनी त्या दिल्या असल्याचे सांगण्यात आले. एवढ्या वरच न थांबता खारेपाटण येथील पंचशील नगर, सम्यक नगर बंदरवाडी व चर्मकारवाडी या तीन मागासवर्गीय वस्त्यांना मिळून एकूण २४ बँचेस आल्या होत्या. यापैकी ३ वस्त्यांना २ प्रमाणे ६ बँचेस देऊन उर्वरित १२ बँचेस गावातील इतर वस्तीत वाटल्या असल्याचे जनतेच्या निदर्शनास आले आहे. याबाबत स्थानिक कार्यकर्त्यांनी जाब विचारला असता सबंधित ग्रामपंचायतने आपली चूक झाल्याचे कबुल केले.

याबाबत सामाजिक एकता मंच सिंधुदुर्गच्या वतीने बुधवारी दि.२१/८/२०२४ रोजी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सिंधुदुर्ग याना लेखी निवेदन देण्यात आले असून सदर प्रकरणाची चोकशी करण्यात यावी असे सांगण्यात आले आहे. तर साहायक आयुक्त समाज कल्याण सिंधुदुर्ग यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार सदर बँचेस ग्रामपंचायतीला वाटप केल्या असल्याचे सांगण्यात आले तर बँचेस तसेच बँच कुणी दिल्या ? त्याचे नाव टाकण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. तर जिल्ह्यातील १२१ मागासवर्गीय वस्त्यांची लाभार्थी म्हणून यादी प्रत्येक ग्रामपंचायतीला पाठविण्यात आली असल्याची माहिती देखील देखील लेखी पत्राद्वारे सामाजिक एकता मंच सिंधुदुर्ग यांना कळविण्यात आले असल्याचे समाजकल्याण सहायक आयुक्त सिंधुदुर्ग यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

एखादी योजना शासन मागासवर्गीय जनतेसाठी मंजूर करते तेव्हा ती योजना त्यांचे पर्यंत पोहचते का ? किंवा त्याचा लाभ खरोखरच वंचित लाभार्थी शेवटच्या घटकाला होतो का? याची देखील शाहनिशा व खात्री शासानाने केली पाहिजे. अन्यथा स्वातंत्र्याच्या ७५ वर्षाच्या गप्पा मारणारे आपण आजही येथील मागासवर्गीय जनतेला त्यांना मिळणाऱ्या शासनाच्या सोयी सुविधा व हक्कापासून आणि लाभापासून पारतंत्र्यात ठेवतो आहे. ही विकसित भारतातील गंभीर बाब असल्याची प्रतिक्रिया बौद्ध समाजाचे कार्यकर्ते संतोष पाटणकर यांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!