कणकवली आगारात ‘राजमाता जिजाऊ’च्या पाच नव्या बस दाखल

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण; प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासाचा विश्वास

कणकवली (प्रतिनिधी) : एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस गाड्यांचे लोकार्पण शनिवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. फीत कापून बससेवेचा शुभारंभकरण्यात आला. तसेच श्रीफळ अर्पण करून बस चे विधिवत पूजन करण्यात आले.
लोकार्पणानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी नव्या राजमाता जिजाऊ बस गाड्यांची पाहणी केली. या बसेस अत्यंत आरामदायी असून प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी एसटी बससेवेचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी एसटी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना प्रवाशांना दर्जेदार, वेळेवर आणि विश्वासार्ह सेवा देण्यावर भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. कणकवली आगारात दाखल झालेल्या या पाच नव्या राजमाता जिजाऊ बस गाड्यांमुळे तालुक्यातील प्रवाशांना अधिक चांगली आणि आधुनिक परिवहन सेवा उपलब्ध होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, वाहतूक नियंत्रक दीपक घोडे, यंत्र अभियंता पांडुरंग वाघमारे, आगार व्यवस्थापक अजय गायकवाड, स्थानक प्रमुख श्रीनिवास कदम, नगरसेविका मेघा गांगण, नगरसेवक संजय कामतेकर, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर यांच्यासह राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!