सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस मधून महिलेचे ३ लाखांचे दागिने लंपास

खेड (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस मधून प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्स मधून सुमारे ३ लाखाचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. दिवा रेल्वेगाडीतून बोरिवली मुंबई असा प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील ३ लाख २० हजार रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले. गाडीतील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा उठवत चोरट्याने दागिन्यांवर डल्ला मारला. दागिने चोरीस गेल्याची बाब निदर्शनास येताच महिलेला धक्का बसला. येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपदा संदीप सकपाळ (४४) , रा. आंबये सकपाळवाडी, सध्या आंबये येथील मूळ गावी आले होते. गणरायाला निरोप दिल्यानंतर बोरिवलीला रेल्वेगाडीतून जाण्यासाठी त्या येथील स्थानकात कुटुंबियांसह आल्या होत्या. स्थानकात दाखल झालेल्या सावंतवाडी-दिवा गाडीतील बोगी नं. २२ रेल्वे डब्यात चढल्या. गाडीला गर्दी असल्यामुळे त्या डब्यात खालीच बसल्या होत्या. वीर रेल्वेस्थानकादरम्यान त्यांनी मोबाईल घेण्यासाठी पर्स उघडली असता दागिने लांबवल्याचे निदर्शनास येताच त्यांना धक्का बसला. पर्समधील १ लाख ५० हजार रूपये किंमतीचे व ४० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, २ सोनसाखळ्या, सोन्याचा हार, कानातील झुमके, कानातील २ सोन्याच्या पट्ट्या, २ सोन्याच्या अंगठ्या व कंबरलेला लावायचा चांदीचा छल्ला असा ३ लाख २० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केला. त्यानुसार पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!