शुक्रवार ११ ऑक्टोबरला नवचण्डिका हवन
कणकवली (प्रतिनिधी) : नरडवे गावचे ग्रामदैवत श्री अंबादेवी मंदिरात परंपरेप्रमाणे गुरुवार 2 ऑक्टोंबर रोजी घटस्थापना करण्यात येणार आहे . शुक्रवारी 11 ऑक्टोंबर रोजी पहाटे नवचंडी हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. दसर्याला सोने लुटून या नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे. मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. भक्तांच्या हाकेला धावणा-या अंबाबाईचा महिमा अगाध आहे. गावात नांदणारी शांती तिच्याच कृपेने कायम असल्याचा विश्वास भक्तांमध्ये आहे. करवीरनिवासिनी श्री अंबादेवीचा अंश या देवीमध्ये असल्याची भावना भक्तांची आहे. घटस्थापनेनंतर दस-यापर्यंत बारा-पाच ग्रामस्थ परंपरेनुसार देवळात धार्मिक कार्य पार पाडत असतात. कुडाळ तालुक्यातील जांभवडे येथील भगवती, नरडवेची अंबादेवी आणि कुपवडे येथील होळवादेवी, वर्देची सातेरीदेवी अशा बहिणी आणि वर्दे येथील श्री रवळनाथ त्यांचा भाऊ असल्याचे मानले जाते.
अंबादेवी मंदिरात सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन घटस्थापना केली जाते. गावरहाटीप्रमाणे देवीचे दागिने धुणे, देवीची पूजा, मूर्तीची सजावट, घटस्थापना, ढोल वाजविणे, किरणोत्सव ही कामे बारा-पाचांमधून नेमून दिल्याप्रमाणे केली जातात. यानंतर दररोज पूजा-अर्चा आणि भजने असा कार्यक्रम होतात. सर्व माहेरवासिनी येऊन देवीची ओटी भरतात. आठव्या रात्री नवचंडी हवन होते. यावर्षी गुरुवार 10 ऑक्टोबर रोजी रात्री म्हणजे शुक्रवार (11 ऑक्टोंबर ला) पहाटे हे हवन होणार आहे. या धार्मिक विधिवेळी मोठ्या प्रमाणावर भक्तजन , ग्रामस्थ उपस्थित असतात. दस-याला मंदिराबाहेर असलेल्या आपटय़ाच्या झाडाच्या पानांची लयलूट केली जाते. नवरात्रोत्सवानिमित्त होणाऱ्या विविध कार्यक्रम आणि दर्शनाचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे .