राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख यांची मागणी
कणकवली (प्रतिनिधी) : लोकसभेत भारतीय घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्षाद शेख यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरये, कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा सरचिटणीस वरुणकर, तालुका उपाध्यक्ष प्रदीपकुमार जाधव, युवक तालुकाध्यक्ष अनिकेत दहीबावकर आदी उपस्थित होते. पुढे बोलताना इर्षाद शेख म्हणाले की संविधान वरील चर्चेत गृहमंत्री शहा यांनी आंबेडकर आंबेडकर हे नाव घेतले तितके जर देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री शहा यांचे शब्द अवमानकारक होते. संविधान निर्मिती झाल्यावर मनुवादी वृत्ती ने संविधानाची होळी केली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे देशातील संविधान वादी जनतेला देवसमानच आहेत. अमित शहा यांना 400 पार जागा आणून लोकसभा निवडणुकीनंतर संविधान बदलायचे होते. भाजपाचे नेतेच असे सांगत होते.लोकसभा निवडणुकीत संविधान मानणाऱ्या जनतेनेच भाजपला धडा शिकवला त्यामुळे संविधान बनविणाऱ्या डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्याबद्दल भाजपच्या मनात राग आहे. तो राग गृहमंत्री शहा यांनी लोकसभेत बोलून दाखवला. त्यामुळे गृहमंत्री शहा राजीनामा द्यावा, शहा यांनी राजीनामा दिला नाही तर पंतप्रधान मोदी यांनी शहा यांचा राजीनामा घ्यावा असेही शेख म्हणाले.












