कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील सातारल कासरल येथील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहाराच्या खोलीच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून ४ हजार ५७५ रुपयांची भांडी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय बळीराम सावंत यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली.
जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा सातारल कासरल ही शनिवार २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. बंद करण्यात आली होती. सोमवारी २३ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. शाळेचे मुख्याध्यापक व अन्य शिक्षक आले असता त्यांना पोषण आहाराच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसला. तसेच खोलीतील व कपाटातील काही पोषण आहाराची भांडी निदर्शनास आली नाही. त्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापक दत्तात्रय सावंत यांनी याबाबतची माहिती कणकवली पोलिसांना दिली. याप्रकरणी अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.










