कारच्या धडकेत माेटर सायकलस्वाराचा मृत्यू

पत्नी व दोन मुलगे जखमी ; कारचालकाने कार गाडी सह पळ काढला

कुडाळ (प्रतिनिधी) : अज्ञात कारची धडक लागून झालेल्या मोटरसायकलच्या अपघातात मोटार सायकल चालक कृष्णा चव्हाण (वय 45, रा. नेरूर, आदर्शनगर) यांचे उपचारादरम्यान गोवा येथील रुग्णालयात निधन झाले. तर त्यांची पत्नी व दोन लहान मुलगे हे जखमी आहेत.. अपघात झाल्यानंतर कारचालकाने कार गाडी सह पलायन केले.

या प्रकरणी अज्ञात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून कारचालक व कारचा शोध निवती पोलीस घेत असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली.

या अपघात प्रकरणी निवती पोलिस ठाण्यात राधिका चव्हाण यांनी खबर दिली की, गुढीपाडव्या निमित्त म्हापण येथे जत्रा असते. सदरच्या या जत्रेसाठी बुधवारी सांयकाळी उशिरा नेरूर आदर्श नगर येथील कृष्णा चव्हाण हे त्यांच्या मोटार सायकल वरून पत्नी राधिका चव्हाण व मुलगा कौस्तुभ चव्हाण (वय11 वर्ष), श्रेयस चव्हाण (वय 8 वर्ष) या सर्वांना घेवुन निघाले होते.

या दरम्याने रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ते पाट गांधीनगर येथील लाकूड गिरणीच्या कडील रस्त्यावर आले असता, मागून येणाऱ्या एका कार गाडीची त्यांच्या मोटारसायकलच्या उजव्या हँडलला धडक लागली. यामुळे ते सर्वजण मोटर सायकल सहित रस्त्यावर जोरात आढळले.

या अपघातात मोटरसायकल चालक कृष्णा चव्हाण हे गंभीर जखमी झाले. तर पत्नी राधिका, मुलगे कृष्णा व श्रेयस हे ही जखमी झाले. या सर्वांना कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र कृष्णा चव्हाण यांची हे गंभीर जखमी असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले. परंतू रात्री उशिरा 1 वाजण्याच्या सुमारास उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले..

सदरच्या या अपघाताची माहिती मिळताच घटना पीएसआय सुधीर कदम, पोलीस हवालदार एस. पी. कांबळे, पराग पोकळे यांनी जात तपास पंचनामा केला. तसेच या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक एस. आर. राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पंढरीनाथ नांगरे हे करीत आहेत.

या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात कार चालकावर निवती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन निवती पोलिस अपघातातील कार गाडी व कारचालक यांचा कसून शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!