कोल्हापूर (प्रतिनिधी) : किल्ले विशाळगड आणि त्यावरील परिसर या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 प्रमाणे तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, शाहूवाडी यांनी 4 जानेवारी 2025 अन्वये अधिसुचना काढलेली आहे. त्या अधिसुचने प्रमाणे त्या ठिकाणचा दर्गा / देव देवतांची मंदिरे येथे सकाळी 10.00 ते सायं. 5.00 या वेळेत भक्त व पर्यटकांना दर्शनासाठी जाणेस परवानगी देणेत आलेली आहे. मात्र कोल्हापूर जिल्हयामध्ये अपर जिल्हादंडाधिकारी कोल्हापूर यांनी 26 डिसेंबर रोजीचे बंदी आदेशान्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोट कलम (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) नुसार मनाई आदेश लागू केलेला आहे.
किल्ले विशाळगडावरील हजरत पीर मलीक रेहान मिरासो या दर्ग्याच्या ऊरूसाचा कार्यक्रम 12 ते 14 जानेवारी 2025 रोजी आयोजित केलेला आहे. विशाळगड हा किल्ला राज्य पुरातत्व विभागाचे ताब्यात असून संचालक राज्य पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी 10 जानेवारी 2025 अन्वये विशाळगड किल्ल्यावर ऊरूस अथवा कोणताही धार्मिक कार्यक्रम, समारंभ करण्यास परवानगी नाकारलेली आहे. त्याप्रमाणे तालुका प्रशासन व पोलीस निरीक्षक शाहूवाडी हे कार्यवाही करीत आहेत. परंतु किल्ले विशाळगड येथे भक्त, पर्यटक यांना दर्गा, मंदिराचे दर्शन घेणेसाठी व पर्यटनासाठी सकाळी 10.00 ते सायं. 5.00 या वेळेत कोणतीही बंदी नाही असे तहसिलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी शाहूवाडी यांनी सांगितले आहे.










