टेम्पाेतून गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमाला रंगेहात पकडले

वैभववाडी पोलिसांची भुईबावडा घाटात कारवाई

वैभववाडी (प्रतिनिधी) : गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडून त्यांच्या ताब्यातील चार बैल व टेम्पो असा ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वैभववाडी पोलिसांनी भुईबावडा घाटात ही कारवाई केली. या प्रकरणी राजाराम उर्फ राजू नारायण बनसोडे रा. केरवडे ता.गगनबावडा जिल्हा कोल्हापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

गोहत्या बंदी कायदा असताना गुरांची राजरोस वाहतूक करून विकणारा टोळ्या कार्यरत आहेत. भुईबावडा घाटातून अशा प्रकारे  गुरांची वाहतूक करून विक्रीसाठी नेत असल्याचे पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी सकाळी पोलीस कॉन्स्टेबल राहुल तळस्कर,वाहतूक पोलीस कृष्णांत पडवळ यांनी  भुईबावडा घाटात सापळा लावून घाटातून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा टेम्पोची तपासणी केली असता,टेम्पोतून चार बैल घेऊन जात असल्याचे दिसून आले. सदर टेम्पो ताब्यात घेऊन वैभववाडी पोलीस ठाणेत आणून संबंधिताची  चौकशी करून कत्तल करण्याच्या उद्देशाने अवैद्य पशु वाहतूक प्रकरणी बनसोडे यांच्या विरोधात  गोहत्या प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत. या गुन्ह्यात पकडलेले बैल वैभववाडी पोलिसांनी मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत.

error: Content is protected !!