चौके (प्रतिनिधी) : काळसे धामापूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी विद्यामंदिर काळसे व स्वर्गीय जयश्री वामन प्रभू कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय काळसे,यांचा पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सकाळच्या सत्रात पारितोषिक वितरण सोहळा संस्थाध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष सी.ए. हेमंत परब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सरंबळ हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक विवेकानंद बालम आणि उद्योजक सयाजी सकपाळ उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे सर्व संचालक व मान्यवर देखील उपस्थित होते. यावेळी वर्षभर क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
द्वितीय सत्रात विद्यालयाच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी विविध रंगारंग कार्यक्रम सादर केले. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थाध्यक्ष सी.ए. हेमंत परब यांनी केले. ” गणेश वंदना “, “लेक वाचवा लेक शिकवा”, या संदेश पूर्ण नृत्याविष्कारासह विठ्ठल महिमा,श्रीकृष्ण महिमा, रिमिक्स डान्स असे सदाबहार सादरीकरण विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे संस्थेमार्फत स्पर्धात्मक स्वरूपात गुणदर्शन पर कार्यक्रम घेतले गेले आणि विजेत्यांना रोख स्वरूपात पारितोषिक संस्थेच्या विश्वस्तांनी स्वनिधीतून दिले.
या सोहळ्यात संस्थेचे आजी-माजी पदाधिकारी पालक ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन मुख्याध्यापक अविनाश परब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी केले.











