तळेरे (प्रतिनिधी) : शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी वाहून घेतलेल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा – सिंधुदुर्ग यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शाळा पुरस्कार उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद विद्या मंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी तालुका – वैभववाडी या शाळेची निवड करण्यात आली आहे. याबद्दल शाळेचे विविध स्तरातून कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या शाळेने 2020/ 21 मध्ये फाईव्ह स्टार मिळवून स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळविलेला आहे तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या माझी सेंद्रिय परसबाग स्पर्धेत सतत तीन वर्षात तालुका स्तरावर प्रथम क्रमांकाचे हॅट्रिक करून जिल्हास्तरावरील पारितोषिक प्राप्त केले आहे. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा टप्पा क्रमांक – 1 मध्ये शाळेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रुपये – एक लाख पटकावले आहे. नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार क्रीडा महोत्सवात या शाळेने वैयक्तिक पारितोषिकांबरोबर ज्ञानी होणार (लहान गट) समूह गायन स्पर्धा (मोठा गट) 50 × 4 दिलेले (लहान गट) यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला. या शाळेने यशाची परंपरा कायम राखली आहे. अशा या शाळेचा गौरव सोहळा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीय संघटनेच्या त्रैवार्षिक अधिवेशनात रविवार, दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय सिंधुदुर्ग नगरी येथे मंत्री नितेश राणे (मत्स्य व बंदर विकास मंत्री महाराष्ट्र शासन) तसेच आम. दीपक केसरकर (विधानसभा सदस्य महाराष्ट्र शासन) आम. निलेश राणे (विधानसभा सदस्य महाराष्ट्र शासन) कपिल पाटील (माजी आमदार विधान परिषद महाराष्ट्र शासन) आणि संघटनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थिती संपन्न होणार आहे. तरी सदर कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी आवाहन गोपाळ कोकाटे (अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती) तथा बाप्पी मांजरेकर (माजी जि. प. सदस्य) सुधीर नकाशे, पुरूषोत्तम कोकाटे, संजय पेडणेकर (पोलीस पाटील नाधवडे) परशुराम ईस्वलकर (तंटामुक्ती अध्यक्ष नाधवडे) संजय नकाशे (सामाजिक कार्यकर्ते नाधवडे) यांनी पत्रक काढून कळविले आहे.
विद्या मंदिर नाधवडे ब्राह्मणदेव- नवलादेवीवाडी शाळेला आदर्श शाळेचा मुकुट












