शाळा दुरावस्थेबाबत योग्य दखल न घेतल्यास २६ जानेवारी रोजी उपोषणाचा दिला इशारा
वैभववाडी (प्रतिनिधी) : अचिर्णे कडूवाडी प्राथमिक शाळेच्या दुरावस्थेबाबत दि.९-१०-२०२४ रोजी गटविकास अधिकारी यांना सविस्तर निवेदन देऊन मोडकळीस असलेली शाळा व भिंतीना गेलेले तडे याबाबत फोटो दाखवून परिस्थिती याबाबत कल्पना दिली होती. तसेच माजी सभापती लक्ष्मण रावराणे यांच्या माध्यमातून शाळेच्या इमारतीच्या दुरावस्थेबाबत पहाणी करुन प्रस्ताव देखील वरिष्ठांना सादर करण्यात आला होता. तरी देखील आजपर्यंत या विषयावर प्रशासनाने काहीच लक्ष न दिल्याने उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी आज पुन्हा एकदा या प्रकरणी गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. येत्या ८ दिवसांत जिल्हा परिषद प्रशासनाकडून योग्य दखल घेवून कार्यवाही बाबत माहिती न मिळाल्यास दि.२६ जानेवारी रोजी पंचायत समिती कार्यालया समोर कडुवाडी पालक व ग्रामस्थांसहीत उपोषण करणार असल्याचा इशारा गटविकास अधिकारी पं.स.वैभववाडी यांना दिला आहे.












