“जिल्ह्यात वीरशैव लिंगायत समाज भवन होण्यासाठी प्रयत्न करणार…” – दिलीप तळेकर
खारेपाटण (प्रतिनिधी) : “सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीरशैव लिंगायत (गुरव) समाज बांधव मोठ्या संख्येने राहत असून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे यांच्या माध्यमातून या समाज बांधवांसाठी जिल्ह्यात वीरशैव लिंगायत समाजाचे भव्य असे समाज भवन होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे भावपूर्ण उदगार कणकवली तालुका भाजप अध्यक्ष तथा माजी पं.स.सभापती दिलीप तळेकर यांनी वारगाव ता.कणकवली येथे वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या जिल्हास्तरीय वार्षिक स्नेह मेळाव्यात बोलताना काढले.”
“एक दिवस समजासाठी” या ब्रीदवाक्य खाली राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमाला वीरशैव लिंगायत (गुरव )समाजाचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण लिंगायत (पांग्रडकर) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर वारगाव गावचे उपसरपंच नाना शेट्ये, तळेरे माजी उपसरपंच शैलेश सुर्वे, शैलेश कोकाटे,दिलीप काणकेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांचा वीरशैव लिंगायत (गुरव) समाज सिंधुदुर्गचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण लिंगायत यांचे शुभहस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीरशैव लिंगायत समाजाचे युवा कार्यकर्ते मयुरेश लिंगायत यांनी विशेष प्रयत्न केले. तर या स्नेह मेळाव्याला वीर शैव लिंगायत समाजाचे समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.










