“मावळे आम्ही स्वराज्याचे” यांच्या कणकवली विभाग मोहीमच्या टीमने केली गडाच्या कोसळलेल्या प्रवेशद्वाराची साफसफाई
शिरगांव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या चाफेड गावातील दुर्लक्षित असलेला असा ” दुंडाचा गड ” अर्थात दुर्गाचा गड या गडावर रवि. १९ जाने. रोजी मावळे आम्ही स्वराज्याचे या सामाजिक संस्थेच्या कणकवली विभागाच्या टीमने प्रत्यक्ष भेट देऊन या गडाच्या मुख्य प्रवेश द्वाराजवळची साफसफाई करून काळाच्या ओघात बुजलेला हा प्रवेशद्वार काही प्रमाणात मोकळा केला. ही टीम या वर्षभरात या गडावर २५ मोहीम राबविण्याचा या संस्थेचा मानस आहे. त्याबद्दल चाफेड गावचे सरपंच किरण मेस्त्री यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
चाफेड गावाची शान असलेल्या या गडावर यापूर्वी अनेक दुर्गप्रेमी संस्थांनी भेट देऊन स्वच्छ्ता मोहीम राबविली. यात प्रशांत वाघरे यांच्या दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे या गावचे सुपुत्र विशाल राणे यांच्या टीमने या गडावर भेट देऊन स्वच्छ्ता मोहीम राबवली. त्यानंतर दुर्ग मावळा प्रतिष्ठान चे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांच्या टीमने गेल्यावर्षी या गडावर भेट देऊन स्वच्छ्ता मोहीम राबवून ठिकठिकाणी “दुंडाचा गड” असे नामफलक लावले. यासाठी चाफेड ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच किरण मेस्त्री यांनी देखील आर्थिक मदत केली. या गडाला पूर्वी दुर्गाचा गड असे म्हणायचे. पण गणेश नाईक यांनी या संदर्भात ऐतिहासिक माहिती घेऊन या गडाचे नाव ” दुंडाचा गड ” आहे याचे पुरावे गोळा केले. आणि मग या गडावर तसे नामफलक लावण्यात आले. त्यामुळे या गडाच्या संशोधनाला चालना मिळाली.
आता तर मावळे आम्ही स्वराज्याचे या टीमने संस्थापक अध्यक्ष सुमित कूशे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष अनंत आचरेकर यांच्या टीमने या गडावर दोन वेळा भेट दिली आणि आता तिसऱ्या वेळी या टीमने या गडाचे बुजलेले मुख्य प्रवेश द्वार साफ करून या गडाला मोकळा श्वास दिला.या प्रवेशद्वाराजवळ भले मोठे खडक पडल्याने हे द्वार बुजलेले आहे. ते काही प्रमाणात साफ केले. वर्षभरात ही मोहीम अशीच चालू राहणार असून या गडाला पुन्हा एकदा गतवैभव मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करणार असे जिल्हाध्यक्ष अनंत आचरेकर यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत तर्फे, कणकवली तालुकाध्यक्ष प्रतीक भाट, खजिनदार नील आचरेकर, सल्लागार प्रियांका नरे, शांताराम सादये, रक्षिता सावंत, पूनम पवार,प्रकाश तेली, मयूर रांबाडे, उमेश रांबाडे, मयूर मांडवकर, रसिका चव्हाण, रोहन रांबाडे, इक्बाल शेख यांनी सहभाग घेतला. यावेळी चाफेड सरपंच किरण मेस्त्री, माजी सरपंच आकाश राणे, माजी सरपंच संतोष साळसकर यांनी भेट देऊन त्यांच्या या कामाचे विशेष कौतुक केले.
या गडावर अदभुत असे भुयार असून या भुयारात प्रवेश केल्यावर आत ५०० माणसे बसतील एव्हडी मोठी जागा आहे. या भूयाराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा दगड आहे. तो बाजूला केल्यावर आत प्रवेश करता येऊ शकतो. याबाबत माजी सरपंच आकाश राणे सांगतात की या भुयारात ५०० माणसे बसू शकतील एव्हडी मोठी जागा असू शकते असे आमचे पूर्वज सांगतात. तसेच या गडाच्या मध्यभागी राजवाड्याचा चौथरा आहे. गडावर टेहळणी बुरुज आहेत. दोन मोठे औरस चौरस हौद आहेत. घोड्याची पाग आहे. दुर्गाच्या चाळ्याचे ठिकाण आहे. त्यामुळे या भुयाराचे आणि सर्व ऐतिहासिक बाबींचे उत्खनन आणि संशोधन झाल्यास अनेक गोष्टीचा उलघडा होऊ शकतो. कदाचित आत भुयारात ऐतिहासिक वस्तू मिळू शकतात. यावर मावळे आम्ही स्वराज्याचे या संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनंत आचरेकर यांनी दुजोरा देत सांगितले की, आमची संपूर्ण टीम वर्षभरात या गडावर भेट देत उत्खनन आणि संशोधन करणार आहोत. यासाठी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने लागणारी सर्वतोपरी मदत करायला आम्ही तयार आहोत. ज्या ज्या वेळी ही टीम या गडावर येईल त्यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी स्वतःहून उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सरपंच किरण मेस्त्री यांनी केले.













