आचरा (प्रतिनिधी) : आचरा बाजारपेठ येथील साईप्रसाद ज्वेलर्स दुकानातून सोन्याच्या वस्तूंवर डल्ला मारून पळ काढणाऱ्या दोन अज्ञात संशयितांपैकी एक संशयित याकूब जानशहा इराणी वय 57 याला ताब्यात घेण्यात पोलीसांना यश आले आहे. संबंधित संशयिताला पुणे येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेवून शनिवारी सकाळी आचरा पोलीसांकडे सुपूर्द केल्याची माहिती आचरा पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी दिली.
सोळा आक्टोंबर रोजी सायंकाळी आचरा बाजारपेठ येथील साईप्रसाद ज्वेलर्स दुकानात दोन अज्ञात व्यक्ती दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने येवून हातचलाखी करत सुमारे १ लाख २६ हजार रुपये किंमतीचे दागिने लंपास केले होते. काहीवेळाने कारेकर यांच्या चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आल्यावर संशयितांची शोधाशोध करून पोलिसांना माहिती देण्यात आली होती. दरम्यान, संशयित चोरटे हे दुचाकीवरून आले होते. त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सीसीटिव्हीत कैद झाली होती. तसेच एका दुकानाच्या सीसीटीव्हीत दोन्ही चोरट्यांची छबी कैद झाली होती. याबाबत तपास आचरा पोलीस निरीक्षक पोवार यांच्या मार्ग दर्शनाखाली सुरु होता.यातील एक संशयीत याकूब जानशहा इराणी वय 57 याला स्थानिक गुन्हे अन्वेषण सिंधुदुर्ग पुणे येथून ताब्यात घेऊन आचरा पोलीसांच्या ताब्यात दिला आहे.












