नवीन कुर्ली वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत द्या

वसाहतीसाठी मंजूर जलजीवन विहिरीचा लाभ लोरेवासीयांना

नवीन कुर्ली वसाहतीत लोरे मधील पितापुत्राचा हस्तक्षेप

नवीन कुर्ली विकास समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी वेधले जि. प. सीईओं चे लक्ष

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : पुनर्वसन नियमानुसार नविन कुर्ली वसाहतीला प्रथम स्वतंत्र ग्रामपंचायत मिळणे आवश्यक आहे, अशा आशयाचे निवेदन नविन कुर्ली विकास समिती फोंडाघाटचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी जि. प. सीईओंना सादर केले. यावेळी उत्तम तेली, सेनापती सावंत, देवेंद्र पिळणकर आदी उपस्थित होते.

अलिकडेच गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर नळ योजना चुकीच्या पदधतीने व बाहेरील गावातील व्यक्तीकडून राजकीय स्वार्थासाठी राबविली जात असल्यामुळे गावात गटतट निर्माण झाले आहेत. त्यामुळे गावातील सामाजिक सलोखा व शांतता भंग होण्याची भीती आहे. गावाला सद्य स्थितीत जुन्या योजनेवरुन मुबलक व मोफत पाणी पुरवठा होत असल्याने आम्हाला गावात भांडणे निर्माण करणारी नळयोजना नको. शासन व लोक प्रतिनिधींनी सर्व प्रथम आम्हाला हक्काची ग्रामपंचायत द्यावी नंतर आम्ही विकास कामे सुचवू. अलीकडेच लगतच्या लोरे गावातील पिता-पुत्र पुढाऱ्यांचा हस्तक्षेप वसाहतीत वाढला आहे. आम्हांला स्वतंत्र ग्रामपंचायत मिळणार नाही यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. वसाहतीतील 275 पैकी 75 घरे लोरे ग्रामपंचायतीला परस्पर जोडली आहेत. हे सर्वस्वी चुकीचे आहे. प्रकल्पग्रस्त म्हणून शासनाने आम्हाला हे रितसर भूखंड दिले आहेत. जलजिवन मधून आमच्या गावठाणसाठी मंजूर 46 लाखाची नळ योजना राबविताना अधिकारी व लोकप्रतिनिधींनी आम्हाला विश्वासात घेतलेले नाही. सदर योजनेची विहीर लोरे गावाच्या हद्दीत असून या योजनेवरुन तेथील काही घरांना परस्पर पाणी पुरवठा करण्याचा काही जणांचा हेतू आहे. मुळात नविन कुर्ली वसाहतीला गेली 14 वर्षे नियमित मुबलक व मोफत पाणीपुरवठा होत असून आम्हाला पर्यायी नळ योजनेची आवश्यकता नाही. प्रशासनाने नव्याने प्रस्तावित नळयोजना रद्द करावी अन्यथा आम्हा प्रकल्पग्रस्तांना आंदोलन छेडावे लागेल. तरी आम्हाला स्वतंत्र ग्रामपंचायत द्यावी, असे अनंत पिळणकर यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!