बेजबाबदार डॉक्टरवर कारवाईची मागणी..!

आचरा (प्रतिनिधी) : गेल्या काही वर्षांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सुधारत आहे.परंतु, बर्‍याच उपचारांसाठी अजूनही गोव्याची वाट धरावी लागत आहे. त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेवरील डॉक्टर अत्यंत बेजबाबदारपणे आपले काम फक्त पाठी टाकायच्या भूमिकेत असताना दिसत आहेत. एक तर अपघातातील रूग्ण आणि त्याचे नातेवाईक मानसिकदृष्ठ्या खचलेले असतात. ते चिंतेत असतात, या परिस्थितीत १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेवरील डॉक्टरने त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याऐवजी हे डॉक्टर फक्त पाठी टाकायचे काम करताना दिसत आहेत,

प्रकरण असे की, मालवण तालुक्यातील पळसंब येथील एका युवकाचा तीन दिवसांपूर्वी कणकवली येथे अपघात झाला. या अपघातात याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते. परंतु पुढील उपचारासाठी गोवा येथील बॅम्बोलिन रूग्णालयात हलवाअशी डॉक्टरांनी शिफारस केली. त्यानंतर १०८ रूग्णवाहिकेतून त्याला गोव्याला नेण्यात आले. या प्रवासात रूग्णवाहिकेसोबत असलेल्या डॉक्टर यांनी रूग्णासोबत फक्त दोघांनाच प्रवासात घेतले. त्यानंतर गोवा येथे पोहोचल्यावर रूग्णाच्या आई-वडिलांना कोणतेही मार्गदर्शन न करता हे डॉक्टर पुन्हा सिंधुदुर्गात निघून आले. अशा परिस्थितीत मदत न करता केवळ औपाचारिकता पूर्ण करून या डॉक्टरने रूग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना वार्‍यावर सोडल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशा बेजबाबदार डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे आचरा विभाग प्रमुख चंद्रकांत गोलतकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!