न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट च्या १९६९-७० एसएससी बॅच चा स्नेहसोहळा उत्साहात
फोंडाघाट (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे चालू वर्षाचा न्यु इंग्लिश स्कूल,फोंडाघाट चा सन १९६९-७० चा एसएससी बॅच स्नेहसोहळा मोठ्या उत्साहात रेडकर फार्मवर सहपरिवार संपन्न झाला. मैत्रीच्या प्रांगणात वयाचे बंधन नसतं म्हणतात ! पडलेले टक्कल, जाड काचेचा चष्मा,पांढऱ्या केसांचे जंगल, दुखरी ढोपरे, मधुमेह- ब्लड प्रेशर,- कार्डियाक च्या गोळ्या, इ.निसर्गाचे वयोमानाप्रमाणे झालेले बदल आणि उतारावरील स्पीड ब्रेकर वर मात करून मुंबई, सावंतवाडी, ओरस, कणकवली, डामरे, घोणसरी, लोरे ,वैभववाडी येथील सर्वजण आपापल्या अर्धांगिनीसह चैतन्यमय सोहळ्यास एकत्र जमले….
यावेळी सर्वांनाच हा ग्रुप तयार करण्यात स्व. मोहन सामंत आणि स्नेहसोहळ्याची संकल्पना राबवणारे, स्व. विजयकुमार पत्की या मित्रवर्यांची उणीव जाणवत होती. सर्वांचे स्वागत करताना पु. ल.देशपांडे यांच्या कविता कीर्तीवान रावराणे यांनी सादर केली– भेटी झाल्या नाहीत तरी गाठी बसणं महत्त्वाचं, हे ज्यांनी जाणलं त्यांनी माणूसपण जाणलं ! अशा शब्दात आपल्या एकत्र येण्याचे महत्त्व सांगितले. सर्वांनी आपल्यामध्ये हयात नसलेल्या गुरुजनांना आणि मित्रांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतरच्या गप्पागोष्टी, आनंद, खट्याळपणा, विनोद,गाणी या हास्यानंदात प्रत्येक जण यथेच्छ डुंबून रिचार्ज झाला. स्नेहसंमेलनातून काय मिळवले? काय साध्य झाले ? यावर योगाचार्य मित्र डॉ तुळशीराम रावराणे यांनी विचार मांडताना, योगाचे महत्त्व विशद केले. श्रीकृष्ण रेडकर यांनी पुढील स्नेहसंमेलन पर्यटन स्थळी आयोजित करण्याची सूचना सर्वांनीच उचलून धरली…
अर्धांगिनींच्या गप्पांना तर उधाण आले होते.त्यातच नुकतेच संपन्न झालेल्या रथसप्तमीचे हळदीकुंकू त्यांनी सानंद साजरे केले. आणि आपल्या परंपरांचे दर्शन घडविले. दुपारचे यथेच्छ सुग्रास जेवण मोज-मस्ती- मजा या वयात संपूच नये असे वाटत असताना, दिवस मावळतीकडे झुकू लागला. आणि ” निरामय आरोग्य राखू या, पुन्हा पुन्हा भेटूया ,,! या घोषवाक्यावर सर्वांनीच एकमेकांना पुढील स्नेहोत्सवा पर्यंत निरोप घेतला….












