राजकारणी आणि पत्रकारांनी जिल्हा विकासात पुढे नेऊया!

कणकवली तालुका पत्रकार समितीच्या पुरस्कार, बक्षीस वितरण सोहळ्यात आम.नीतेश राणे यांचे प्रतिपादन

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील सर्व पत्रकार संघांमध्ये कणकवली तालुका पत्रकार संघ नक्कीच पहिल्या क्रमांकावर आहे. कारण येथील पत्रकार परिषदांना नेहमीच न्याय मिळतो. पत्रकारिता आणि राजकारण ही दोन्ही वेगवेगळी क्षेत्रे असली तरी दोन्हींचा उद्देश ‘समाजपरिवर्तन’ हाच आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांचे मित्र नाही म्हटले तरी एकमेकांना पुरक आहेत. दोघांनीही एकमेकांना साथ देऊन जिल्हा विकासात्मक दृष्ट्या पुढे नेऊया, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी केले.

कणकवली तालुका पत्रकार समितीतर्फे विविध पुरस्कार वितरण व निबंध स्पर्धा पारितोषीक वितरण सोहळा कणकवली कॉलेजच्या एचपीसीएल सभागृहात शनिवारी झाला. त्याप्रसंगी श्री. राणे बोलत होते. यावेळी उद्योजक पुरस्कार फोंडाघाट येथील संजय आग्रे, समाजसेविका पुरस्कार असलदे येथील दिवीजा वृद्धाश्रमाच्या संचालिका दीपिका रांबाडे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार संतोष वायंगणकर, शशी तायशेटे स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार महेश सावंत, अनिल सावंत स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार विनय सावंत, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार रमेश जामसंडेकर यांना प्रदान करण्यात आला.

सोहळ्याला नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादीचे नेते तथा नगरसेवक अबिद नाईक, पत्रकार संघ जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव देवयानी वरसकर, उपाध्यक्ष रमेश जोगळे, शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे, मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य गणेश जेठे, तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई, सचिव संजय राणे, डॉ. संदीप साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, पत्रकार संघाचे जिल्हा प्रतिनिधी संतोष राऊळ, महेश सरनाईक, डॉ. पावसकर, नागेश मोरये आदी उपस्थित होते. कणकवली पत्रकारितेची राजधानी सुहास

नीतेश राणे म्हणाले, सिंधुदुर्गात कणकवली महत्वाचा तालुका आहे. जिल्ह्याची राजधानी ओरोस असली तरी पत्रकारितेची राजधानी कणकवलीच आहे. इथल्या पत्रकार परिषदाही प्रभावी छाप पाडणाऱ्या असतात. इथल्या पत्रकारांनी पत्रकारितेचा दर्जा सांभाळला आहे. पण, पत्रकारांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. कारण, तुमच्या बातम्यांनी एखादा पडू शकतो तसाच उद्ध्वस्तही होऊ शकतो. त्यामुळे पत्रकारांनी विश्वासार्हता कायम जपावी. पत्रकार आणि राजकारणी एकमेकांचे मित्र आहेत, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पण, आपण एकमेकांना पुरक आहोत. कारण, बातमी आल्याशिवाय आमचे काम जनतेपर्यंत पोहोचत नाहीत व बातम्या मिळत नाहीत, तोपर्यंत वर्तमानपत्रांचेही काम होणार नाही. त्यामुळे आमचे कधी चुकत असेल तर हक्काने सांगा.

पत्रकारांचे सहकार्य आवश्यक

समीर नलावडे यांनी भाषणाच्या प्रारंभीच पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांच्या प्रास्ताविक भाषणाचे अभिनंदन केले. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेत कणकवली पत्रकार संघाला अपेक्षित यश मिळाले नाही. कारण, कणकवलीमध्ये सुसज्ज स्टेडियमची कमतरता आहे. मात्र, खूप मोठा निधी ‘स्टेडियम’साठी मिळत असून स्टेडियम सुसज्ज व्हावे, यासाठी पत्रकारांचेही सहकार्य आवश्यक आहे.

पत्रकारिता कोर्स सुरु करणार

डॉ. राजश्री साळुंखे म्हणाल्या, पत्रकार हा समाजात जागरुकता निर्माण करणारा घटक आहे. बदलत्या काळात शैक्षणिक क्षेत्रातही पत्रकारितेला महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आमच्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयामध्ये पत्रकारितेचा कोर्स लवकरच सुरु करत आहेत. त्यासाठी सर्व पत्रकार बांधवांचे सहकार्य गरजेचे आहे.

कणकवलीची पत्रकारिता प्रामाणिक

अबिद नाईक म्हणाले, कणकवली पत्रकार समिती गेली अनेक वर्षे पुरस्कारांचे, स्पर्धाचे आयोजन करीत आहे. त्याचे अनुकरण जिल्हयातील अन्य पत्रकार समिती, संघांनीही करावेत. येथील पत्रकार सडेतोड प्रामाणिक पत्रकारिता करतात. तालुक्याच्या जडणघडणीत येथील पत्रकारांचे मोठे योगदान आहे. आमच्या चुकाही आम्हाला पत्रकारांच्या माध्यमातून समजत असतात. या पत्रकारांची एकजूटही विशेष कौतुकास्पद आहे, असे नाईक म्हणाले.

कणकवली पत्रकारांचे स्तुत्य उपक्रम

उमेश तोरसकर म्हणाले, कणकवली पत्रकार समितीचे उपक्रम नेहमीच स्तुत्य असतात. समितीतर्फे पत्रकार व कुटुंबियांचे उत्कृष्ट गेट टू गेदर’ भरवले जाते. त्यापासून प्रेरणा घेऊन जिल्हा पत्रकार संघही अशा ‘गेट टू गेदर’चे आयोजन करणार आहे. मी १९८५ साली पत्रकारीतेत आलो, त्यावेळी संपर्कासाठी विशेष साधने नव्हती. मात्र, आता सोशल मिडियाचा काळ आहे. बातम्या व्हॉट्सअॅपवर येऊ लागल्यात. तरीही जिल्हयाची पत्रकारिता नेहमीच दर्जेदार राहिली आहे.

पत्रकारांचे जिल्हा विकासात योगदान

गणेश जेठे म्हणाले, समाजातील प्रश्न, समस्या, घडामोडी यांची सर्वकश माहिती घेऊन, समाजहीत डोळयासमोर ठेवून केलेली सुसंगत मांडणी म्हणजे पत्रकारिता. काळासोबत पत्रकारिताही बदलली आहे. अर्थात बदल ही अपरिहार्य बाब आहे. मात्र, यामध्येही प्रिंट मिडिया नेहमीच लक्षवेधी राहणार आहे. सिंधुदुर्गच्या विकासप्रक्रियेत पत्रकारांचाही मोठा वाटा आहे.

सत्य लोकांपर्यंत पोहोचवूया

पुरस्कारप्राप्त संतोष वायंगणकर म्हणाले, ज्या महाविद्यालयात शिकलो, त्याच महाविद्यालयामध्ये पुरस्कार वितरण सोहळ्यात मला पुरस्कार प्रदान केला गेला, याचा आनंद आहे. तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मी पत्रकारितेत आलो. आज पत्रकारितेत बातमी सर्वप्रथम पोहोचविण्याची स्पर्धा आहे. मात्र, यात सत्य बातमीच लोकांपर्यंत पोहोचेल, याची काळजी घ्या. पत्रकारांची शाबासकी महत्वाची

पुरस्कारप्राप्त संजय आग्रे म्हणाले, कणकवली पत्रकार समितीने दिलेली शाबासकीची थाप माझ्यासाठी महत्वाची आहे. कधीकाळी दोनवेळच्या जेवणाचाही प्रश्न होता. पण, परमेश्वराची साथ आणि जिद्द यामुळे यशस्वी उद्योजक होऊ शकलो. कणकवलीच्या विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. सर्व क्षेत्रांचा उहापोह पत्रकारितेतूनच

पुरस्कारप्राप्त दीपिका रांबाडे म्हणाल्या, उद्योग, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांचा उहापोह करणारे क्षेत्र म्हणजे पत्रकारिता आहे. या जिल्हयात औद्योगिकता विकसीत व्हायला हवी. जेणेकरून येथील तरुणाला जिल्ह्यातच रोजगार मिळेल व वडिलधाऱ्यांना वृद्धाश्रमांमध्ये वास्तव्य करण्याची गरज राहणार नाही. याबाबत पत्रकारांनीही पुढकार घ्यावा.

समाजहितासाठी पत्रकार कटिबद्ध

प्रास्ताविकात चंद्रशेखर देसाई म्हणाले, प्रत्येकाने एक ध्येय निश्चित करायला हवे. २५ वर्षे पत्रकारितेत काम केल्यानंतर मी आज समितीचा अध्यक्ष म्हणून या व्यासपिठावर आहे. आम्ही समजाचाचे देणे लागतो, याच भावनेतून निबंध, चित्रकला अशा स्पर्धांचे आयोजन करतो. मागील दोन वर्षांमध्ये पत्रकार समितीने दशावतार कलावंतांना धान्यवाटप, स्वच्छता मोहीम असे अनेक उपक्रम राबविले आहेत. पत्रकारिता करताना आम्ही समाजहितासाठी नेहमीच कटीबद्ध राहू

यावेळी तालुका पत्रकार समिती आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाला तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मीकांत भावे यांनी केले. पुरस्कारप्राप्त मान्यवरांचा परिचय राजन चव्हाण यांनी करून दिला. आभार पत्रकार समितीचे खजिनदार नितीन कदम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!