वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आजगाव गावात अंदर बाहर जुगार तेजीत सुरू असून पोलिसांच्या डोळ्यावर हात ठेवून जुगारी बेडर होऊन रात्रीच्या अंधारात जुगार खेळत आहेत. आजगाव मधील या जुगार अड्ड्यात जिल्ह्यातील २७ नामचीन खिलाडी तक्षिमदार असल्याची चर्चा आहे. संपूर्ण सिंधुदुर्गातील बडे खिलाडी या ठिकाणी रात्रीच्या पटावर आपले नशीब आजमावत लाखो रुपयांची उधळण करत आहेत. सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्याच्या सीमेलगत आजगाव चिरेखाण येथे मागील काही दिवसांपासून दररोज रात्री १० वाजल्यानंतर बैठक सुरू होते. अगदी पहाटेपर्यंत लाखो रुपयांचा व्यवहार या अंदर बाहर जुगारात होत असून याकडे स्थानिक पोलिस आणि एलसीबी चे दुर्लक्ष कसे होते असा सवाल उपस्थित होत आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात अवैध धंदे सुरू राहता नये अशी सक्त सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एसपी अग्रवाल यांनीही प्रत्येक पोलिस ठाणे प्रभारी यांना सक्त ताकीद देत जुगार तसेच अवैध धंद्यांवर कडक कारवाई चे आदेश दिले आहेत. स्थानिक पोलिसांसोबत एलसीबी चे अधिकारी कर्मचारी सुद्धा अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवत आहेत. अलीकडेच एलसीबी जे सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे छापा मारून जुगार खेळताना काहीना रंगेहाथ पकडले होते. तरीही आजगाव मध्ये निडरपणे जुगार कसा सुरू आहे ? हा प्रश्न आहे.
आजगाव मध्ये अंदर बाहर जुगार तेजीत












