साबा सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या वतीने खारेपाटण हायस्कूलला भरघोस निधी प्राप्त

खारेपाटण (प्रतिनिधी) : साबा सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड,मुंबई यांच्या वतीने कंपनीचे फायनान्स मॅनेजर महेश शेट्ये यांच्या माध्यमातून खारेपाटण प्रशालेला नुकताच सुमारे १२ लाख रुपयाचा निधी स्कूल बस खरेदीसाठी प्राप्त झाला असून खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवासाची यानिमित्ताने सोय होणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेता स्कूल बसची प्रशालेला अत्यंत आवश्यकता होती. ही गरज ओळखून साबा सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांनी हा निधी उपलब्ध करुन दिला. यापूर्वी देखील साबा सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्या माध्यमातून प्रशालेला सुसज्ज संगणक लॅब सुमारे १० लाख रुपये खर्च करून उपलब्ध करून देण्यात आली. तसेच प्रशालेच्या जुन्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी एका वर्ग खोलीचे नूतनीकरण सुमारे २ लाख पन्नास हजार रुपये खर्च करून देण्यात आले.

अशाप्रकारे आतापर्यंत खारेपाटण प्रशालेला सुमारे २५ लाख रुपयांचा निधी साबा सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई चे फायनान्स मॅनेजर महेश शेट्ये यांच्या माध्यमातून प्रशालेला उपलब्ध झाला आहे. यापुढे देखील प्रशालेची मगरज ओळखून प्रशालेला भरघोस स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्याची भावना महेश शेट्ये यांनी व्यक्त केली आहे. यासाठी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी विशेष प्रयत्न केले.

त्यांच्या या भरीव आर्थिक सहाय्याबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव महेश कोळसुलकर, मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत सर्व शिक्षक, पालक प्रतिनिधी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांनी साबा सॉफ्टवेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांचे आभार व्यक्त केले आहेत.

error: Content is protected !!