ओरोस (प्रतिनिधी) : सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी मिरा भाईंदर येथील अब्दुलकादर अबूबक्कर खान (वय ६२) यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड यांनी सहा हजार रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सरकारी अभियोक्ता म्हणून रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
३० सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी १.३० वाजता बांदा पोलीस ठाणे येथे पोलीस नाईक विनोद चव्हाण हे कर्तव्यात असताना अब्दुलकादर खान यांनी विनोद चव्हाण यांना त्यांचे शासकीय काम पार पाडू नये या उद्देशाने त्यांना दम देऊन त्यांचे डोकीवर व कानावर हाताचे डोशाने मारहाण केली. तसेच त्यांना मुकामार दिला. त्यामुळे शासकीय कामात अडवळा निर्माण केला म्हणून पोलीस नाईक चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने त्यांना सहा हजार रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा सुनावली आहे.











