आंगणेवाडी भाविकांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी

वैद्यकीय सेवेसाठी ४८ डॉक्टर तैनात

ओरोस (प्रतिनिधी) : आंगणेवाडी श्री देवी भराडी देवीच्या वार्षिक जत्रेला येणाऱ्या भाविकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी पिण्याचे पाणी शुध्दीकरण मोहीम तसेच आरोग्य सेवा देण्यासाठी ४८ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांनी दिली आहे. आंगणेवाडीच्या वार्षिक यात्रोत्सवा निमित्त श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र गोवा आणि इतर राज्यातून असंख्य भाविक 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी आंगणेवाडीत भेट देणार आहेत. यानिमित्ताने आरोग्य विभागाने नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपाय योजना केलेल्या आहेत.

मागील पंधरा दिवसापासून आरोग्य विभागाद्वारे आंगणेवाडी मधील पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तसेच सर्व स्त्रोतांची पाणी नमुने तपासणी करून घेण्यात आलेले आहेत. टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे शुद्धीकरण करण्याची खबरदारी घेण्यात येत असून यात्रेनिमित्त लावण्यात आलेल्या हॉटेल्स, कोल्ड्रिंक्स मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके भेट देवून ओटी टेस्ट द्वारे पाणी नमुने तपासणी करत आहे. भाविकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून या उपाययोजना करण्यात येत आहेत.

यात्रे दरम्यान येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा पुरवता याव्यात या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाच्या वतीने वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. तसेच विशेष तज्ञ डॉक्टरांची एकूण तीन पथके तयार करण्यात आलेली असून ही पथके यात्रा कालावधीमध्ये 24 तास कार्यरत असणार आहेत. या पथकांमध्ये 13 तज्ञ डॉक्टर तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाकडील 35 डॉक्टर अशा प्रकारे एकूण 48 डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके देखील नियुक्त करण्यात आलेली असून ही पथके देखील 24 तास रुग्ण सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

error: Content is protected !!