खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण रामेश्वर नगर येथील सर्व्हिस रोड च्या कामाला नुकतीच महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सुरवात करण्यात आली असून खारेपाटण गावचे माजी सरपंच रमाकांत राऊत यांनी नुकतीच या कामाची पाहणी करून सर्व्हिस रोड चांगला बनविण्याच्या सूचना केल्या. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेश द्वारावर असलेले मुख्य शहर असून महामार्गाचे काम पूर्ण झाले.मात्र रस्त्याचा दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड उपलब्ध नसल्याने अनेकदा या महामार्गावर अपघात होऊन कित्येकजण जखमी झालेले आहेत तर काही जण मृत्युमुखी पडलेले आहेत.खारेपाटण ग्रामस्थांच्या वतीने अनेकदा सबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यात आली असताना देखील या सर्व्हिस रोड कामाकडे दुर्लक्ष केले जात होते.अखेर माजी सरपंच रमाकांत यांनी याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांचेकडे हा प्रश्न मांडला व खारेपाटण मधील अपूर्ण सर्व्हिस रोड चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली होती. आज खारेपाटण रामेश्वर नगर येथील सर्व्हिस रोड चे काम हाती घेण्यात आले असून यामुळे मुंबई – गोवा महामार्गावरून थेट पोंभुर्ले – मणचे रोड कडे जाणाऱ्या रस्त्याला हा सर्व्हिस रोड जोडण्यात येणार असून यामुळे येथील अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे.
खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन कडे जाणारा सर्व्हिस रोड कधी करण्यात येणार ..?
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर वरील खारेपाटण येथे सर्व्हिस रोड चे काम जरी सुरू असले तरी महामार्गावरून थेट खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन चिंचवली गावाकडे जाणारा सर्व्हिस रोड कधी करण्यात येणार असा सवाल आता ग्रामस्थ करत असून येथे देखील वारंवार अपघात घडत असतात.याची महामार्ग प्राधिकरण समितीने दखल घेऊन लोकांच्या जीवाशी खेळण्या पेक्षा रस्त्यावरील अतिक्रमणे वेळीच हटवून खारेपाटण मधील सर्वच अत्यावश्यक सर्व्हिस रोड लवकरात लवकर बनविण्यात यावे अशी जोरदार मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.














