सिंधुदुर्गचे अक्षरोत्सवकार निकेत पावसकर यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्कार

बोडस चॅरिटेबल ट्रस्ट रत्नागिरीचे ५ पुरस्कार जाहीर…!

प्रथमच सर्व पुरस्कार कर्मचारी प्रवर्गाला

आचरा (प्रतिनिधी) : गेली १३ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती किंवा विशेष कार्य करणाऱ्या असाधारण व्यक्ती आणि समाजसेवी संस्था यांना विविध पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्ट रत्नागिरीने आपले, सन २०२४-२५ साठीचे कर्तव्यनिष्ठा व कार्यगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल आणि एक पुस्तक असे आहे, तर कार्यगौरव पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल, पुस्तक आणि रुपये ३,००० असे आहे.यात रत्नागिरी जिल्ह्यातील ४ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ व्यक्तीचा समावेश आहे. प्रथमच एका वर्षी सर्व पुरस्कार हे कर्मचारी प्रवर्गात कार्यरत व्यक्तींना देण्यात येत आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील कुवारबांव येथील जागुष्टे हायस्कूल येथे प्रथम ५ वर्षे विनाअनुदानित आणि नंतर अनुदानित तत्वावर ३३ वर्षे असे सुमारे ३८ वर्षे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करणारे रवींद्र भिवा शिंदे (रवींद्रनगर, कारवांची वाडी) यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

गुहागर येथील श्री दुगदिवी देवस्थान येथे १५ वर्षे व्यवस्थापिका या पदावर कार्यरत असलेल्या श्रीमती शलाका चंद्रशेखर खरे (वरचा पाट), दिव्यांग असूनही जवळपास ३० वर्षे हातखंबा तिठा येथे दोन प्रकारच्या सेवा देऊन निवृत्त झालेले श्री. प्रभाकर कमलाकर घवाळी (तारवेवाडी हातखंबा), गाडीतळ येथील जनसेवा ग्रंथालयात लिपिक पदावर काम करताना गेली २० वर्षे शब्दांकुर या हस्तलिखित दिवाळी अंकात एकहाती पुनर्लेखन करणाऱ्या सुजाता मधुकर कोळंबेकर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील तळेरे या ग्रामीण ठिकाणी गेल्या १९ वर्षात १७०० पेक्षा जास्त व्यक्तीच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह केलेले, पत्रकार निकेत नरहरी पावसकर (कनिष्ठ लिपिक, कासार्डे विद्यालय) यांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कार प्राप्त ५ व्यक्तींपैकी पैकी रत्नागिरी तालुक्याबाहेरील २ सन्मानिताना त्यांचे सन्मानपत्र, पुस्तक शाल आणि पुरस्काराची रक्कम त्यांच्या कार्याच्या ठिकाणी रजिस्टर पोस्ट आणि बैंक द्वारे दिली जाणार आहे. कुवारबांव येथील वींद्र भिवा शिंदे, रत्नागिरी शहरातील सुजाता मधुकर कोळंबेकर आणि तारवेवाडी हातखंबा येथील प्रभाकर कमलाकर घवाळी यांचा गौरव, ७ मार्च ते ०९ मार्च २०२५ या कालावधीत त्यांच्या कामाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार ॲडव्होकेट आदिती अभिजित पटवर्धन यांनी कळवले आहे.

error: Content is protected !!