पालकमंत्र्यांच्या पहिल्या संपर्क दालनाचे उद्घाटन
ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आपले प्रश्न व प्रशासकीय पातळीवर रेंगाळलेली कामे मार्गी लागावी म्हणून पालकमंत्री संपर्क कक्ष सुरू करण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर जनतेची सर्व कामे गतिमान व्हावीत ही अपेक्षा आहे. जनतेचा सेवक म्हणून मी आठवड्यातून एकदा तरी माझ्या दौऱ्यात या कक्षामध्ये उपस्थित राहून जनतेसाठी वेळ देणार आहे, अशी माहिती पालकमंत्री कक्ष उद्घाटन प्रसंगी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी दिली.
यावेळी मंत्री राणे यांनी, जिल्हास्तरावरील प्रश्न व राज्यस्तरावरील काही मागण्या या कक्षामार्फत मार्गी लागतील व जनतेचे हे हक्काचे दालन बनेल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी या पालकमंत्री कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे प्रशासकीय पातळीवर रखडलेले प्रश्न मार्गी लागावे व त्यांना त्यासाठी मदत मिळावे म्हणून पालकमंत्र्यांचे संपर्क कार्यालय शनिवारपासून सुरू झाले. प्रशासकीय संकुलातील जिल्हाधिकारी भवनात पालकमंत्र्यांचे संपर्क कार्यालय प्रथमच सुरू झाले असून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे एक महत्त्वाचे केंद्र निर्माण झाल्यामुळे जनतेतून चांगल्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
आजच्या महिला दिनानिमित्त भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते उद्घाटन फित कापून झाले. खरे तर मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन होणार होते. मात्र महिला दिनानिमित्त महिलांना सन्मान देत मंत्री नितेश राणे यांनी हे उद्घाटन श्वेता कोरगावकर यांच्या हस्ते करण्याचा घेतलेला निर्णय आदर्श ठरला व महिलांचा सन्मान यानिमित्ताने झाला. आपल्या भाषणात प्रारंभीच आजच्या महिला दिनानिमित्त सर्व महिलांना त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. उद्घाटन झाल्या नंतर नितेश राणे यांनी या कार्यालयात स्थानापन्न होत उपस्थित अनेक अन्यायग्रस्तांचे प्रश्न समजावून घेतले. व निवेदनही स्वीकारली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सुप्रिया वालावलकर भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
