बॅ नाथ पै सेवांगणचे आयोजन
मसूरे (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले पुण्यतिथीचे औचित्य साधून कट्टा परिसरातील अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस, व आशा सेविका यांचा सत्कार बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे संपन्न झाला. महिलानी सर्वप्रथम स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. अर्थ साक्षरता महत्वाची असून अर्थ विषयक सर्व व्यवहार सक्षमपणे करता आले पाहिजेत. मोबाईल अभ्यासपूर्ण हाताळता यायला हवा. मासिक पाळी संबंधी अंधश्रद्धा झुगारून देऊन शास्त्रीय दृष्टीकोनातून त्याकडे पाहायला हवे. आपल्या कौशल्या नुसार अवांतर काम करून आपला आर्थिक स्थर उंच करा असे आवाहन स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणच्या प्राध्यापिका डॉ. सुमेधा नाईक यांनी महिलाना मार्गदर्शन करताना केले.
किशोर शिरोडकर यांनी आज आपण महिला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात याचे सारे श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. त्या सावित्रीबाईंविषयी आपल्या सर्वांच्या मनात कृतज्ञता असणे आवश्यक आहे. आपण कोरोना काळात केलेली सेवा व नेहमीच अल्प मानधनात करत असलेले कर्तव्य याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपला सन्मान आम्ही करीत आहोत. यापुढेही आपण आपली सेवा समाजासाठी द्याल अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. कार्याध्यक्ष दीपक भोगटे म्हणाले, अनेक दिवस अत्यंत सेवाभावी वृत्तीने काम करीत असणाऱ्या आपणा सर्वांचा सत्कार करण्याचे मनात होते.आज त्याची फलश्रृती झाली असं मत व्यक्त करून सेवांगणच्या उपक्रमाची माहिती दिली.
वैष्णवी लाड यानी आपल्या खुमासदार शैलीत सूत्रसंचलन केले. प्रारंभी अनिता नेवाळकर, अण्णा वाडकर व प्रणिता नाईक याना आदरांजली वाहाण्यात आली. सर्व महिलांचा भेटवस्तू व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास प्रा डॉ सुमेधा नाईक, शोभा म्हाडगुत, अदिती शृंगारे, विजयालक्ष्मी डगरे, अर्चना धुत्रे, वीणा म्हाडगुत, वैष्णवी लाड, रिया जांभवडेकर, गीता नाईक, तांबट बाई, मुळीक बाई, नातू बाई, किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, दीपक भोगटे, काळसेकर सर, विद्या चिंदरकर परिसरातील अंगणवाडी कर्मचारी व आशाताई
उपस्थित होत्या.















