मुख्य कार्यकारी अधिकारी खेबूडकर यांनी केली पाहणी
ओरोस (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवसांच्या १० कलमी कार्यक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्यावतीने जुने अभिलेख नाशन करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाला बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी भेट देत पाहणी केली.
शासनाने १०० दिवसाची कार्यालयीन सुधारणाची १० कलमी विशेष मोहिम जाहीर केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कार्यालयीन स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये प्रशासकीय कालबाहय अभिलेख नाशन करण्यात येत असून, नवीन कार्यवाही पूर्ण झालेले अभिलेख अभिलेख कक्षात जतन करुन ठेवण्यात येत आहेत. यामुळे जूने कालबाहय अभिलेख नाशन केल्यामुळे नवीन अभिलेख ठेवण्यासाठी जागा उपलब्ध होणार आहे. तसेच जून्या अभिलेख्याच्या रददी विक्रीतून जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नात भर पडणार आहे.
दरम्यान, बुधवारी या उपक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक उदय पाटील, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी किशोर काळे, विस्तार अधिकारी मेहरे, उमेद जिल्हा समन्वयक वैभव पवार आदी उपस्थित होते.












