माणगाव आऊट पोस्ट क्षेत्रात जुगार तेजीत

जुगार अड्डा बंद न झाल्यास पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात लक्ष वेधणार ?

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील माणगाव पोलिस आऊट पोस्ट क्षेत्रात अंदर बाहर जुगार तेजीत सुरू असून पोलिस यंत्रणा यावर कधी कारवाई करणार ? असा प्रश्न जनतेत व्यक्त होत आहे. माणगाव येथील पेट्रोल पंपामागे हा अंदर बाहर जुगार जोरात सुरू असून सायंकाळी ५ ते रात्री उशिरापर्यंत दररोज लाखो रुपयांची उधळण या अंदर बाहर पटावर होते. एकीकडे खुद्द पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गात अवैध धंद्यांना थारा नाही असे ठणकावले आहे तर दुसरीकडे अवैध धंदे सुरू असल्यास सक्त कारवाई चे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिले आहेत. असे असतानाही बेडरपणे जुगार चालवायची हिंमत कशी होते ? याला झारीतील शुक्राचार्यांचाच वरदहस्त आहे काय ? तसे असल्यास अवैध धंद्याची पालखी वाहणारे जे भोई असतील त्यांच्यावर खात्यांतर्गत कारवाई होणेही गरजेचे आहे. हा जुगार अड्डा बंद न केल्यास पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात लक्ष वेधणार असल्याचे माणगाववासिय म्हणत आहेत.

error: Content is protected !!