कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, कोल्हापूर व जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन साळे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी संभाजी पवार, कागल- राधानगरीचे उप विभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक सुनिता नेर्लीकर, करवीर तहसिलदार स्वप्नील रावडे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान विचारवंत होते. या महामानवाच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वाचनाची आवड निर्माण करावी, सर्वांनी वाचनाला जास्तीत जास्त वेळ द्यावा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास करुन आपल्याला संविधान दिले आहे. त्यानिमित्ताने आपण सर्वांनी वाचनाकडे वळण्याचा संकल्प करुया असे सांगून ते पुढे म्हणाले, शासनाच्यावतीने घर घर संविधान अभियान सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने हे अभियान जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्याचा संकल्प केला असून या अभियानांमध्ये जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. उपस्थित सर्व नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या जयंतीनिमित्त शुभेच्छाही यावेळी त्यांनी दिल्या.
यावेळी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेएन एस. यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त उपस्थित सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. सुरुवातीस पोलीस बँड पथकाच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय संविधानाची उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. उपेक्षित दलित सामाजिक परिषद (भारत), शुभ आरंभ फौडेंशन, ख्रिश्चन एकता मंच यांच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान व महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन कागल- राधानगरीचे उप विभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, करवीर तहसिलदार स्वप्नील रावडे व इतर मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. या कार्यक्रमांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बिंदू चौक येथे मंडप, पिण्याच्या पाण्याची सोय व इतर अनुषंगिक सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी अमित घवले, मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष प्रेमानंद मौर्य, समितीचे सचिव वैभव प्रधान, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, बाळासाहेब भोसले, जयसिंग जाधव, महेश बावडेकर, ॲड. किरण कांबळे, डी.जी. भास्कर, आर. के. कांबळे, सदानंद डीगे तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
