समायोजनाने मुंबई बाहेर जाणार नाही!

मुंबईतील अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचा शिक्षक भारती सभेत ठाम निर्धार

मुंबई (प्रतिनिधी) समायोजनाने मुंबई बाहेर जाणार नाही, असा निर्धार मुंबईतील शेकडो अतिरिक्त शिक्षकांनी आज शिक्षक भारती कार्यालयात पार पडलेल्या सभेत व्यक्त केला. उद्या दिनांक 2 मे 2025 रोजी शिक्षण उपसंचालक मुंबई कार्यालय येथे सायंकाळी 4 वाजता मुंबई बाहेर समायोजन करण्यास नकार कळविण्यासाठी शेकडो शिक्षक जमणार आहेत. अशी माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

शिक्षण विभागाकडून समायोजन स्थगित न केल्यास मा. शिक्षणमंत्री यांना भेटून मुंबई बाहेर समायोजन करू नये अशी विनंती करणार असे माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सांगितले.तसेच गरज पडल्यास नगरविकासमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली जाईल, असे कपिल पाटील यांनी उपस्थित शिक्षकांना सांगितले.

शिक्षण विभागाकडून जबरदस्तीने मुंबई बाहेर समायोजन करण्यात येत आहे. समायोजन न घेतल्यास वेतन थांबविण्याची भीती दाखविली जाते आहे. मुंबईतील शिक्षकांचे समायोजन मुंबईत होऊ शकते पण मग मुंबई बाहेर का जायचे? असा सवाल या सभेत अतिरिक्त शिक्षकांनी केला. अनुदानित शाळा वाचवण्यासाठी मुंबईत शिक्षक टिकवून ठेवणे शासनाची जबाबदारी आहे. मराठी व प्रादेशिक भाषा टिकवण्यासाठी शाळेतील विद्यार्थी संख्या कमी आहे सांगून शिक्षक अतिरिक्त करणे योग्य नाही. शासनाने याबाबत तातडीने कार्यवाही करत समायोजन न थांबवल्यास आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला.

error: Content is protected !!