वैभववाडी (प्रतिनिधी) : समतेचा संदेश, शांततेचा मार्ग आणि न्यायाची चळवळ या त्रयींच्या विचारांनी भारत घडला आहे. आजच्या सामाजिक असमानतेच्या काळात या महामानवांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवले, तर सम्राट अशोकांनी धम्माचा स्वीकार करून अहिंसेचा मार्ग दाखवला. बुद्धांच्या तत्त्वज्ञानाने जगाला करुणेचा संदेश दिला, जो आजही तितकाच कालसुसंगत आहे. आपण सर्वांनी मिळून या विचारांना आपल्या आचरणात आणले, तर खऱ्या अर्थाने भारत सामाजिक समतेकडे वाटचाल करेल.असे प्रतिपादन कवी साहित्यिक प्रकाश सकपाळ यांनी केले.
वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ वैभववाडी यांच्यावतीने राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 134 वा जयंती उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी सकपाळ प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. विचारमंचावर वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाचे कार्याध्यक्ष सुभाष कांबळे,उपाध्यक्ष संतोष कदम, राजेंद्र कांबळे, विश्वास पेडणेकर, सरचिटणीस रवींद्र पवार,संजय जंगम, महिला मंडळाच्या अध्यक्ष शारदा कांबळे,कार्याध्यक्ष मोहिनी कांबळे सरचिटणीस रुचिता कदम, अंकुश पवार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आली. यावेळी धम्म ध्वजारोहण व बुद्धपूजा पाठ घेण्यात आली. यात वैभववाडी तालुका संघांचे बौध्द उपासक सहभागी झाले होते. यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते संभाजी चौक, मच्छी मार्केट वैभववाडी अशी भव्य अभिवादन रॅली काढण्यात आली. या अभिवादन रॅलीत हजारोंच्या संख्येने आंबेडकर अनुयायी पांढरी शुभ्र वस्त्र,डोक्यावर निळी टोपी परिधान करून आबाल वृद्धांसह कडकडत्या उन्हात सहभागी झाले होते. यावेळी महामानवांच्या जयघोषाने वैभववाडी शहर दणाणून सोडले.
त्यानंतर तालुक्यातील कलाकारांचा भीम-बुद्ध गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमांने सर्वांना मंत्र मुग्ध केले. यावेळी संजय जंगम, अजित कदम प्रफुल जाधव,मंगेश कांबळे, रुपेश कांबळे, राजेंद्र पवार, कृष्णा कांबळे, उदय जाधव, अक्षय पवार, ऋचा पवार, स्मिता पवार यांच्यासह वैभववाडी तालुक्यातील बौद्ध बांधव -भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


