चावडी वाचनासह विविध क्रीडा स्पर्धा, शिष्यवृत्ती परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांचा करण्यात आला गुणगौरव
वैभववाडी (प्रतिनिधी) : आज १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर उपस्थित पालक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत चावडी वाचन उपक्रम पार पडला. त्यानंतर शाळेत विविध क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा व राज्य स्तरावर उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने स्पोर्ट्स शुज तसेच विविध शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना ब्रॅण्डेड वॉच भेट देऊन गौरविण्यात आले. वैभववाडी शहर परिसरातील विद्यार्थीनींना यावेळी सायकल वाटप करण्यात आले. त्यानंतर सन २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात किलबिल ते १२ वी पर्यंत सर्व इयत्तांमध्ये वार्षिक परीक्षेत प्रथम तिन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थी व शिक्षक यांना नुतन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे, संचालक विजय रावराणे, शरद नारकर, माता पालक संघाचे अध्यक्ष व व्यापारी मंडळाचे तालुकाध्यक्ष तेजस आंबेकर, मुख्याध्यापक बी.एस.नादकर प्रशालेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















