कणकवली (प्रतिनिधी) : महसूल विभाग कणकवली, तहसील कार्यालय आणि कणकवली कॉलेज कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शाळा तेथे दाखला’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम कार्यक्रम कणकवली कॉलेज कणकवली एचपीसीएल हॉलमध्ये गुरुवार दि. 24 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत संपन्न झाला. या उपक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी कणकवली तालुका तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मा. दीक्षांत देशपांडे, शि. प्र. मंडळ कणकवली कॉलेज कणकवलीचे चेअरमन डॉ. सौ. राजश्री साळुंखे, सहाय्यक महसूल अधिकारी दिलीप पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. सोमनाथ कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. महादेव माने, समन्वयक आणि व्यावसायिक विभाग प्रमुख प्रा. हरिभाऊ भिसे, सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी, शिक्षक वर्ग, तलाठी, पोलीस पाटील उपस्थित होते.
या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी मा. दीक्षांत देशपांडे यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांस “शाळा तेथे दाखला” या उपक्रमाची माहिती देत तत्काळ दाखले उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. डॉ. सौ. राजश्री साळुंखे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत अशा प्रकारचे उपक्रम सर्व नागरिकांस उपयुक्त असून त्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य कणकवली कॉलेज कणकवलीच्या वतीने करण्यात येईल असे स्पष्ट केले.
या शिबिरात दिवसभरात 98 प्रमाणपत्रे देण्यात आले. त्यातील निवडक दाखल्यांचे वितरण पालक आणि विद्यार्थ्यांना करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विजयकुमार सावंत व आभार प्रदर्शन मा. दिलीप पाटील यांनी केले. या शिबिर आयोजनासाठी कणकवली कॉलेज कणकवलीचे प्राचार्य युवराज महालिंगे, चेअरमन डॉ. सौ. साळुंखे वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचा लाभ कणकवली तालुक्यातील गावातील बहुसंख्या विद्यार्थी , पालक व नागरिक यांनी घेतला.












