पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार उद्घाटन
विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा मान्यवरांच्या हस्ते होणार सन्मान
कणकवली (प्रतिनिधी) : अल्पावधीत वाचक आणि दर्शकांच्या हृदयात आपले अढळस्थान निर्माण केलेल्या आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचा चौथा वर्धापन दिन सोहळा रविवार दिनांक 27 एप्रिल, 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय येथे संपन्न होत आहे. तळकोकणचा बुलंद आवाज बनलेला आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल आपली वाटचाल वाचकांच्या आणि दर्शकांच्या विश्वासार्हतेमुळे यशस्वीपणे करत आहे. सत्य, विश्वासार्ह बातमी आणि नाविन्यपूर्ण संकल्पना या मूलतत्त्वावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या डिजिटल मीडियात नवी क्रांती घडवणारे आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल केवळ जिल्हा वासीयांच्याच नव्हे तर संपूर्ण तळकोकण वासियांच्या गळ्यातील ताईत बनले आहे.
कोरोना महामारीच्या कालावधीत आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलने अगदी प्रामाणिकपणे आपले समाज जागृतीचे काम चालू ठेवले होते. इत्यंभूत आणि विश्वासार्ह बातमी यासोबतच कोरोना महामारीबाबत जनजागृती करण्यात आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल आघाडीवर होते. पत्रकारितेतील हीच प्रामाणिक परंपरा अजूनही कायम आहे. यासोबतच आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल मार्फत ‘अद्वैत’ हा समाजातील विविध विषयांवर भाष्य करणारा दिवाळी अंक प्रकाशित करण्यात येतो. ‘आजकालची मुलं’, ‘अपराजिता’, ‘सहजीवन’ अशा विविध दिवाळी विशेषांकांमधून न्यूज चॅनेलने आपली समाज प्रबोधनाची आणि जागृतीची परंपरा कायम राखली आहे. ‘अद्वैत’ या दिवाळी अंकाला राज्यभरातील अनेक मानाचे साहित्यिक पुरस्कार देखील प्राप्त झाले आहेत. यासोबतच आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल मार्फत समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा विशेष सन्मान करण्यात येतो. यावर्षी देखील विविध क्षेत्रातील दहा मान्यवरांचा वर्धापन दिनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. या वर्धापन दिन सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले, प्रमुख अतिथी जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, समाजभूषण पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ता संदीप चौकेकर, प्रांताधिकारी जगदीश कातकर, डी. वाय. एस. पी. घनश्याम आढाव, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, पोलिस निरीक्षक मारुती जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेलचे संपादक राजन चव्हाण यांनी केले आहे.













