जागतिक पुस्तक दिना निमित्त श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचराच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन संपन्न
आचरा (प्रतिनिधी) : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने बुधवार २३ एप्रिल रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून ग्रंथप्रदर्शन आयोजित केले होते.सदर ग्रंथप्रदर्शनात कथा, कादंबरी, बालसाहित्य, संदर्भ व इतर प्रकारची पुस्तके लावलेली होती. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून आचरा ग्रामपंचायतीने संस्थेच्या मागणीनुसार लीगल साईज प्रिंटर संस्थेस देणगी दाखल दिला. सदर प्रिंटरचे उदघाटन संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या श्रीम. वैशाली सांबारी यांच्याहस्ते करण्यात आले. दीपप्रज्वलन करून आचरा ग्रामपंचायत सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी यांच्या शुभहस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. पुस्तक दिनाचे महत्व या विषयावर संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या सौ.उर्मिला सांबारी यांनी आपले मत मांडले. सरपंच जेरोन फर्नांडिस म्हणाले कि पुस्तके जगण्याची अनुभूती देतात, आपल्या जीवनात पुस्तकाचे व वाचनालयाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपले विचार व्यक्त करताना यापुढेही वाचन मंदिरास आचरा ग्रामपंचायतीचे नेहमीच सहकार्य राहील, असे सांगितले आश्वासन सरपंच यांनी यावेळी दिले. आचरा ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश कदम व न्यू इंग्लिश स्कूल आचराच्या शिक्षिका सौ.मधुरा माणगावकर यांनीही वाचनाचे महत्व उपस्थितांना पटवून दिले. यांनतर उपस्थित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व कर्मचारी यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन संस्थेतर्फे करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष बाबाजी भिसळे यांनी वाचनाचे महत्व याबरोबरच आचरा ग्रामपंचायतला संस्थेच्या अपुऱ्या जागेबद्दल माहिती देऊन संस्थेच्या विस्तारित इमारतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. संस्थेचे उपाध्यक्ष अशोक कांबळी यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानता मानताच पुस्तक वाचन जीवनात किती महत्वाचे आहे, त्याची माहिती विशद केली. सदर ग्रंथप्रदर्शनास आचरे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य, कर्मचारी, न्यू इंग्लिश स्कूल आचराचे शिक्षक, विद्यार्थीवर्ग, संस्थेचे सर्व कार्यकारिणी सदस्य, सांस्कृतिक समिती सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल सौ. विनिता कांबळी यांनी केले.












